इंद्रायणी महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे, दि.२३ जुलै, २०२५ – “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” अशी धिटाईने इंग्रज सत्तेविरोधात घोषणा देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती इंद्रायणी महाविद्यालयात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, राज्यशास्र व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून राष्ट्रप्रेम व सामाजिक कार्यासाठी योगदान देण्याचा संकल्प केला.

या प्रसंगी इतिहास विभागप्रमुख प्रा. दिपक मोरे यांनी टिळकांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यावर सखोल भाष्य केले. त्यांनी सांगितले की, टिळक हे भारतीय राष्ट्रवादाचे जनक मानले जातात आणि त्यांनी स्वराज्याची संकल्पना सामान्य जनतेपर्यंत पोहचवली.

प्रा. आर. आर. डोके यांनी टिळकांच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना, त्यांच्या लहानपणापासून ते कारावासात घालवलेल्या दिवसांपर्यंतचा प्रवास अतिशय प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी टिळकांनी सुरू केलेल्या केसरी, मराठा या वृत्तपत्रांचा आणि शिवजयंती, गणेशोत्सव या सार्वजनिक उत्सवाद्वारे जनजागृती करण्याच्या भूमिकेचा उल्लेख करतांना, “ते केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हे तर एक महान समाजप्रबोधक होते!” असल्याचे अधोरेखित केले.

Advertisement

कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. पी. भोसले यांनी टिळकांचे शिक्षणातील योगदान, विशेषतः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेबाबत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना टिळकांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर. आर. भोसले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश देवढे, मराठी विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. खंदारे, हिंदी विभागप्रमुख डॉ. एम. व्ही. देशमुख, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एस. मेंगाळ, विज्ञान विभागप्रमुख रोहित नागलगाव, प्रा. आर. एस. आठवले तसेच अन्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. कृष्णा मिटकर यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. एम. व्ही. खांदवे यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी आपल्या संदेशातून विद्यार्थ्यांना टिळकांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कर्तव्यपरायण, जबाबदार आणि राष्ट्रहिताच्या बाबतीत सजग नागरिक बनण्याचे आवाहन केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page