*अर्थशास्त्र : नोकरीपासून उद्योगापर्यंत – करिअरच्या अमर्याद संधींवर मार्गदर्शन*
तळेगाव दाभाडे, –
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “अर्थशास्त्र या विषयातील रोजगाराच्या संधी” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न अकबर पीरभॉय कॉलेज, कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. भालचंद्र कारभारी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश अर्थशास्त्र विषयातील विविध करिअरच्या वाटा, त्यासाठी आवश्यक तयारी आणि योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.
डॉ. कारभारी यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर शिक्षक, प्राध्यापक, संशोधक म्हणून उपलब्ध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासन, वित्त, धोरण-नियोजन अशा क्षेत्रांमध्ये प्रवेश कसा मिळवता येतो, याची माहिती दिली. बँकिंग क्षेत्रात RBI, SBI, SEBI, NABARD तसेच खाजगी बँकांमधील भरती प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि वेतन संरचनेविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. याशिवाय, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात अर्थशास्त्राचे योगदान आणि उद्योजकतेच्या संधींवरही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी भूषविले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले,“अर्थशास्त्र ही केवळ शैक्षणिक शाखा नाही, तर समाजघटनांचा, आर्थिक प्रवाहांचा आणि मानवी प्रगतीचा नकाशा आहे. विद्यार्थी मेहनत आणि योग्य दिशा घेतल्यास या क्षेत्रात नोकरीसोबतच समाजासाठी मूल्यनिर्मितीही करू शकतात.”
या कार्यक्रमाचे आयोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सदाशिव मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. समन्वयक डॉ. अर्चना जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. प्रणिता जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील डॉ. सत्यम सानप यांचे विशेष सहकार्य लाभले.






