ऑस्टोरिया रॉयल्स साईटवर २६ व्या मजल्यावरून पडुन मजुराचा मृत्यू; बांधकाम सुरक्षेची पोलखोल*

SHARE NOW

देहूरोड:रावेत परिसरातील बी.आर.टी. रोडवरील ‘ऑस्टोरिया रॉयल्स’ या बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवर घडलेल्या भीषण दुर्घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे. २६ व्या मजल्यावर काम करत असताना खाली कोसळून एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अपघात कमी आणि सुरक्षेतील गंभीर निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण अधिक असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

 

मृत मजुराचे नाव विक्रम कुमार यादव (वय २३) असे असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास विक्रम ‘माय वन सेंट्रींग’ची प्लेट जोडण्याचे काम करत होता. यावेळी त्याने परिधान केलेला सेफ्टी बेल्ट अचानक मागील बाजूने तुटल्याने त्याचा तोल गेला. क्षणार्धात तो २६ व्या मजल्यावरून खाली कोसळला. सुरक्षेसाठी बसवलेली हिरव्या रंगाची जाळी वजन सहन न करू शकल्याने तीही फाटली आणि विक्रम थेट जमिनीवर आदळला.

Advertisement

 

अपघाताची तीव्रता इतकी होती की विक्रमचे हेल्मेट फुटले. डोके, खांदे आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सहकारी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले, तर बांधकाम साईटवरील सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

या प्रकरणात वापरण्यात आलेले सेफ्टी बेल्ट, जाळी आणि इतर सुरक्षा साधने निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप मजुरांकडून करण्यात येत आहे. “उंच मजल्यांवर काम करताना केवळ नावापुरती सुरक्षा दिली जाते,” अशी संतप्त प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार आणि सेफ्टी इंचार्ज यांची चौकशी सुरू आहे.

 

दरम्यान, वाढत्या उंच इमारती आणि वेगवान बांधकामाच्या स्पर्धेत मजुरांच्या जिवाला दुय्यम स्थान दिले जात असल्याचे हे प्रकरण पुन्हा अधोरेखित करत आहे. नियम कागदावर आणि मृत्यू प्रत्यक्षात, अशी स्थिती केव्हा बदलणार? हा प्रश्न आता सर्वसामान्यांनाही अस्वस्थ करत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page