जीवनविद्या मिशनचा गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे जीवनविद्या मिशन, तळेगाव दाभाडे ज्ञानसाधना केंद्राच्या वतीने गुरुपौर्णिमा कृतज्ञतादिन आणि जीवनविद्येचे युथ मेंटर प्रल्हाद पै यांच्या अमृतमहोत्सवाचा संयुक्त सोहळा वराळे येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात भक्तिभाव, ज्ञान आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरभरून साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठ, अभंग नामसंकिर्तन, उपासना यज्ञ आणि ‘संगीत जीवनविद्या’च्या मधुर सादरीकरणाने झाली. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व सद्गुरुपूजनाने कार्यक्रम अधिकच मंगलमय आणि प्रेरणादायी झाला.
या सोहळ्यात “सद्गुरु महिमा अगाध” या विषयावर चंद्रकांत निंबाळकर यांनी केलेले मार्मिक आणि हृदयस्पर्शी मार्गदर्शन उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ कोरले गेले.
ते म्हणाले, “आपलं मन हेच आपलं खरे सामर्थ्य आहे. आत्मविश्वास आणि दिशा हे मनाच्या योग्य उपयोगातून निर्माण होतात. खरे सद्गुरू आपल्या शिष्याला चमत्कार दाखवत नाहीत, तर शाश्वत ज्ञान देऊन त्याचे जीवन उजळवतात.” या भावसंपन्न
सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते.
मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, राष्ट्रवादी तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष सुरेश धोत्रे, दर्शन खांडगे,
उद्योजक प्रशांत भागवत, तसेच थंडा मामला हॉटेलचे संचालक आणि सद्गुरूंचे शिष्य अविनाश गिते, सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या संपादिका रेखा भेगडे, सत्यम खांडगे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शंकर कावडे, भोरे सर, डॉ. रहाणे, देशमुख, कदम दादा यांचे मोलाचे योगदान लाभले.
स्वागत व प्रास्ताविक शरद बोर्गे यांनी केले, तर सूत्रसंचालन विशाखा चव्हाण, सायली बोऱ्हाडे आणि प्रतिक्षा तनपुरे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ज्ञानसाधना केंद्राचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
गुरुपौर्णिमा आणि अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने झाला हा कार्यक्रम म्हणजे अध्यात्म, आत्मप्रबोधन आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांचा समृद्ध संगम ठरला. जीवनविद्येच्या तेजस्वी विचारांनी भारलेला हा सोहळा अनेकांच्या मनात दीर्घकाळ प्रेरणेचा दीप उजळत राहील.






