मावळ तालुक्यातील महसूल सेवकांचा बेमुदत संप सुरू! चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा मागणी
मावळ :
मावळ तालुक्यातील महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या आवाहनानुसार मावळ तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी मंगळवार दि.२३ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला पाठिंबा देत सुरुवात केली आहे.महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
मावळ तहसील कार्यालयासह तालुक्यातील सर्व महसूल सेवक या आंदोलनात सहभागी झाले असून महसूल सेवक नसल्यामुळे गावस्तरावरील ई-पिक पाहणी, महसूली कामकाज तसेच महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
या आंदोलनामुळे महसूल विभागाशी संबंधित विविध कामांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून शेतकरी व नागरिकांची गैरसोय ही होणार आहे. दरम्यान महसूल सेवक संघटनेच्या मंगळवार दि.२३ सप्टेंबर रोजी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिलेल्या निवेदनानुसार, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.यावेळी निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ कालेकर,उपाध्यक्ष विठ्ठल पाठारे,कार्याध्यक्ष रामदास कदम,संभाजी कुटे,सागर जाधव,श्रीपती गायकवाड,गणेश लांगे,गणेश टिळेकर,चंद्रकांत तळपे,राहुल विधाटे यांच्या सह अनेक महसूल सेवक उपस्थितीत होते.






