देहू फाटा येथे खाजगी बसची एसटी बसला धडक,११जण जखमी
देहू:

चाकण येथील कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खाजगी बसने एसटी बसला पाठीमागून धडक दिली या अपघातात खाजगी बसमधील ११ जन जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दिनांक १६जुलै २०२५रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू फाटा येथे घडली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन खाजगी बस देहू फाटा येथून जात होती. दरम्यान परळ डेपोच्या एसटी बसला खाजगी बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात खाजगी बस मधील ११जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांना अथर्व हॉस्पिटल, पाच जणांना संत तुकाराम महाराज हॉस्पिटल देहू आणि एकाला जनरल हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे दाखल करण्यात आले आहे.बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच एसटी बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.






