गोल्डन रनिंग क्लबतर्फे नववर्ष स्वागतासाठी “फॅमिली रन” उपक्रम.
तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे येथील गोल्डन रनिंग क्लब (GRC) यांच्या वतीने १ जानेवारी रोजी नववर्षाची सुरुवात आरोग्यदायी जीवनशैलीने व्हावी या उद्देशाने “फॅमिली रन” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामागील मुख्य हेतू लहान मुलांचा धावण्याकडे ओढा वाढावा, पालकांना धावताना पाहून मुलांना प्रेरणा मिळावी तसेच समाजाला आरोग्याचा सकारात्मक संदेश द्यावा हा होता.
आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल व स्क्रीनवर अधिक वेळ घालवत असल्याने त्यांना मैदानी खेळ व व्यायामाकडे वळवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न ठरला. सकाळी ६.१५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या फॅमिली रनमध्ये तब्बल २२ मुलांनी पालकांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, तर एकूण ५० हून अधिक धावक या उपक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे सचिव मंगेश मरवाडी यांनी घेतलेल्या स्ट्रेचिंग सत्राने झाली. त्यानंतर धावण्याचा झेंडा गोल्डन रोटरी क्लब, तळेगाव चे अध्यक्ष संतोष परदेशी, महाराष्ट्राची स्ट्राँग वुमन – कु. सेजल मोईकर (वय १८ वर्षे) आणि विशाल खळदे गोल्डन रनिंग क्लब चे अध्यक्ष यांच्या हस्ते दाखवण्यात आला. कु. सेजल मोईकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आणि त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे मुलांमध्ये व उपस्थितांमध्ये विशेष उत्साह संचारला.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक फल्ले, प्रदीप मुंगसे, सुजाता देव, अमोल हिंगे, प्रशांत ताये, अविनाश कुरणे, हेमंत गुजर, सुरज जाट, बाळू चव्हाण आणि तसेच गोल्डन रनिंग क्लबच्या इतर सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडू शकला.
कार्यक्रमाच्या शेवटी GRC अध्यक्ष विशाल खळदे यांनी उपस्थित सर्व धावक, पालक, मुले, पाहुणे व आयोजक सदस्यांचे आभार मानून नववर्षासाठी आरोग्यदायी आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश दिला.






