शाळेत शिक्षण नव्हे कुत्र्याची देखभाल शिक्षकांच्या खांद्यावर नवीन ताण

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

राज्यातील शिक्षक आधीच शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली गांजलेले असताना आता त्यांच्या खांद्यावर आणखी एक अनोखी जबाबदारी टाकण्यात आली आहे. शासनाच्या नव्या फर्मानानुसार शालेय परिसरातील भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्याची जबाबदारी थेट शिक्षकांवर सोपवण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत एका शिक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करून स्वच्छतेसोबतच कुत्र्यांच्या प्रश्नावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.

 

अध्यापन हे शिक्षकांचे मुख्य काम असताना प्रत्यक्षात मात्र त्यांना जनगणना, निवडणूक ड्युटी, कोविड काळातील बंदोबस्त, विविध शासकीय मोहिमा अशी असंख्य कामे करावी लागली. आता प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे अपयश झाकण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही शिक्षकांच्या माथी मारला जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. “आज कुत्री, उद्या बिबटे आणि परवा मगरी हुसकावण्याची जबाबदारीही आमच्यावर येईल का?” असा उपरोधिक सवाल तळेगावातील ज्येष्ठ मुख्याध्यापिका वर्षा थोरात यांनी उपस्थित केला.

Advertisement

 

शालेय परिसरातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त ही स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिकांची जबाबदारी असताना प्रशासन हात झटकून शिक्षकांना वेठीस धरत असल्याचे चित्र दिसत आहे. वर्गात विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याऐवजी शिक्षकांनी काठी घेऊन कुत्र्यांच्या मागे धावावे, ही शिक्षण व्यवस्थेची शोकांतिका असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

या निर्णयामुळे शिक्षकांचा आत्मसन्मान धुळीस मिळत असून अध्यापनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होणार आहे. राज्यभरातील शिक्षक संघटना एकवटल्या असून हा आदेश तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय अपयशावर शिक्षक हा रामबाण उपाय मानण्याची सवय आता धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page