वृंदा गुरुकुल फाउंडेशनचा उपक्रम : मोफत जर्मन लँग्वेज कोर्सद्वारे जागतिक करिअरची वाट
देहू (प्रतिनिधी):
वृंदा गुरुकुल फाउंडेशन अकॅडमी व इंटरनॅशनल प्रीस्कूल, देहू येथे आयोजित करण्यात येत असलेल्या शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठी माध्यमातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये परदेशी भाषा, आधुनिक कौशल्ये आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधींबाबत वाढती जागरूकता व उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे.
या उपक्रमांतर्गत जर्मन व जपानी भाषांचे प्रशिक्षण, त्यासोबतच अबॅकस, फोनिक्स, हॅण्डरायटिंग सुधारणा, संगणकाचे प्राथमिक प्रशिक्षण, स्पोकन इंग्लिश आदी कोर्सेसद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, शैक्षणिक नियोजन आणि करिअर निवडीसाठी आवश्यक मार्गदर्शन नियमितपणे दिले जात आहे.
अलीकडे आयोजित करण्यात आलेल्या जर्मन भाषा मार्गदर्शन सेमिनारमध्ये जर्मन भाषा तज्ज्ञ, “जर्मन भाषा गुरु” या पुस्तकाचे लेखक तसेच Career Hub Technology चे संस्थापक श्री. कैलास गाडे यांनी विद्यार्थ्यांना जर्मन भाषेची मूलभूत माहिती, परदेशातील शिक्षण संधी व करिअरच्या विविध पर्यायांबाबत थोडक्यात पण अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी वृंदा गुरुकुल फाउंडेशनच्या वतीने संस्थापक प्रा. रुपेश फोंडे यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, फाउंडेशन अंतर्गत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच शिकण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत किंवा अत्यंत अल्प शुल्कात शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन दिले जाते. ग्रामीण व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध भाषा प्रशिक्षण व कौशल्यविकासाचे उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय ६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अत्यंत कमी फीजमध्ये ‘प्री-प्रायमरी स्कूल’ उपक्रम राबवून प्राथमिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सर्व उपक्रमांचे आयोजन वृंदा गुरुकुल फाउंडेशन, वृंदा गुरुकुल अकॅडमी व इंटरनॅशनल प्रीस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या सौ. सौरभी रुपेश फोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्चार्ज प्रिन्सिपल सौ. सुरेखा भराडे व सौ. पूजा माळी, ईश्वर झांजे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे भविष्यात विविध भाषा प्रशिक्षण, कौशल्यविकास कोर्सेस तसेच करिअर मार्गदर्शन सत्रे अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.






