देवाभाऊ फाउंडेशनकडून हर्षद लोहार यांच्या उपचारासाठी १० हजारांची आर्थिक मदत!
तळेगाव दाभाडे, दि. १० जून २०२५:
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारा बार्शीचा उमदा तरुण श्री. हर्षद लोहार सध्या गंभीर आजाराशी धैर्याने लढत आहे. त्याच्या खळखळत्या हास्याने आणि उत्साही वृत्तीने सर्वांचे मन जिंकणारा हर्षद आज स्वतः कठीण प्रसंगातून जात आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे; परंतु उपचारांचा प्रचंड खर्च त्याच्या कुटुंबासाठी पेलवणे कठीण झाले आहे.
या संकटसमयी हर्षदच्या मदतीसाठी देवाभाऊ फाउंडेशन पुढे सरसावले आहे. फाउंडेशनच्यावतीने हर्षदच्या उपचारांसाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ही रक्कम फाउंडेशनचे संस्थापक महेश निंबाळकर आणि गजानन जोशी यांनी हर्षदच्या मित्रपरीवारांकडे सुपूर्द केली.
हर्षदच्या या लढाईत त्याला साथ देण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहन देवाभाऊ फाउंडेशनने केले आहे. हर्षदच्या प्रकृतीसाठी सर्वांनी प्रार्थना करूया आणि त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देऊया असे प्रतिपादन फाउंडेशनच्या संस्थापक महेश निंबाळकर यांनी केले.