देहुरोड सज्ज! आंबेडकर जयंतीपूर्वी पोलिसांचा भव्य रूट मार्च; शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
देहुरोड :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देहुरोड पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी विविध भागांत पोलिसांकडून भव्य रूट मार्च काढण्यात आला.
आंबेडकर नगर येथील जामा मस्जिदपासून रूट मार्चची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्वामी विवेकानंद चौक, सरनोबत चौक, गांधीनगर, शितळा नगर अशा संवेदनशील भागांतून पोलिसांनी पायदळ फेरी काढली. या वेळी राज्य राखीव पोलीस दलासह स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता.
मुख्य रस्ते व संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रूट मार्चदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन केले.
तसेच, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी केले. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यानुसार संपूर्ण परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे






