“इंद्रायणी महाविद्यालयात फुले विचारांचा जागर”

SHARE NOW

_तळेगाव दाभाडे :

इंद्रायणी महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग, राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. आर. आर. डोके उपस्थित होते. डॉ . विजयकुमार खंदारे, डॉ. मधुकर देशमुख, डॉ. सदाशीव मेंगाळ, डॉ. सुरेश देवढे, प्रा. दीपक मोरे, प्रा. ज्ञानेश्वर काकडे, डॉ. अर्चना जाधव, डॉ. शुभांगी भालेकर, प्रा. प्रणिता जोशी, डॉ. संदीप कांबळे, प्रा. सचिन चंदनशिवे, प्रा. गावडे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख व्याख्याते प्रा. आर. आर. डोके यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा अत्यंत सखोल व अभ्यासपूर्ण आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, १९व्या शतकात समाजामध्ये असलेल्या विषमता, अंधश्रद्धा आणि शोषणाच्या पार्श्वभूमीवर फुले यांनी शिक्षण, समता आणि मानवतावाद यांचा विचार समाजात रुजविला. त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजपरिवर्तनाची दिशा निश्चित केली.

फुले यांनी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. त्यांनी शूद्र-अतिशूद्रांच्या मुक्तीसाठी आवाज उठविला आणि समाजातील अन्यायकारक परंपरांना आव्हान दिले. “शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे” हा त्यांचा विचार आजही मार्गदर्शक आहे, असे प्रा. डोके यांनी स्पष्ट केले.

Advertisement

तसेच त्यांनी आधुनिक विज्ञानयुगात मानवी प्रगती झाली असली तरी मनामनातील दुरावा वाढत असल्याचे सांगून, फुले यांच्या मानवतावादी विचारांची आज अधिक गरज असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि मनन यांद्वारे स्वतःला घडवून समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी महात्मा फुले यांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचे सखोल अध्ययन आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ यांसारख्या ग्रंथांचे वाचन करण्यास प्रोत्साहित केले. आधुनिक समाज घडविताना समता, बंधुता आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित मनोगत, भाषणे व विचार मांडले. काही विद्यार्थ्यांनी सामाजिक समतेवर आधारित संदेश देत उपस्थितांना प्रेरित केले. यामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण व प्रभावी ठरला.

या प्रसंगी समतेवर आधारित, शोषणमुक्त व विज्ञाननिष्ठ समाज उभारण्याचा संकल्प करण्यात आला. महात्मा फुले यांच्या कार्याचा वारसा जपण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. कृष्णा मिटकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. मिलिंद खांदवे यांनी मानले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही आणि विचारप्रवर्तक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page