देहूरोड पोलिस ठाण्यात अनोखा रक्षाबंधन सोहळा* *महिलांकडून पोलिसांना राखी बांधून कृतज्ञतेची भावना व्यक्त, बहिणींच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे विक्रम बनसोडे यांचे आश्वासन

SHARE NOW

देहूरोड :

रक्षाबंधनाच्या पावन दिनानिमित्त देहूरोड पोलिस ठाण्यात आज एक आगळावेगळा आणि हृदयस्पर्शी सोहळा पार पडला. समाजातील विविध घटकांतील महिलांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना राखी बांधून त्यांच्या सेवेचा गौरव केला. या वेळी मुस्लिम भगिनींचाही सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.

पोलिसांचे काम अखंड चालू असते. कोणताही सण-उत्सव असो, ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात. त्यामुळे घरी जाऊन बहिणीकडून राखी बांधून घेण्याची संधी अनेकदा त्यांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन देहूरोडमधील महिलांनी पुढाकार घेत, पोलिसांना राखी बांधून आपुलकी व्यक्त केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी यावेळी बोलताना सांगितले, “आज आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला राखी बांधण्यासाठी आल्या आहेत, त्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो? आता त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावर अधिक आहे. जर कोणी गुंड, मवाली किंवा टवाळखोर त्रास देत असेल, तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही मदतीला तत्काळ धावून जाऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

या उपक्रमात नगरसेवक रघुवीर शेलार यांचा स्नेह ग्रुप, भाजप महिला आघाडी देहूरोड, माई बाल भवन, तसेच देहू-देहूरोड पत्रकार संघ यांचा सक्रिय सहभाग होता. बहिणींनी राखी बांधताना पोलिस बांधवांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली, तर पोलिसांनी महिला आणि नागरिकांच्या रक्षणासाठी आपल्या जबाबदारीची शपथ घेतली. हा भावनिक सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

*मुख्यमंत्री सहायता योजनेचे महिलांकडून कौतुक*

या प्रसंगी उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत मिळणाऱ्या महिना पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदतीचे कौतुक केले. “या रकमेतून मुलांच्या शिक्षणाची फी, प्रवास खर्च, भाजीपाला यांसारख्या दैनंदिन गरजा सुटतात. फडणवीससारखा भाऊ लाभणे हे आमचे सौभाग्य आहे,” असे मत सविता पिंजण, शंकुतला अगरवालवाल, साधना खंडेलवाल, प्रीती चौधरी, बॉबी डिक्का, विजया मते, शकिरा हैदर, लीला भारध्वज यांनी व्यक्त केले.

 

*मान्यवर उपस्थित*

कार्यक्रमावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलिस निरीक्षक धैर्यशील सोळेंके, प्रभाकर खणसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवनकुमार वाघमारे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून औक्षण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक रघुवीर शेलार, आप्पा लहू शेलार, रवींद्र भेगडे, अशोक शेलार, शक्ती वेल्लू, तसेच भाजपचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page