भंडारा डोंगरावर रविवारपासून नामयज्ञ माघ शुद्ध दशमीचा सोहळा; तुकोबारायांच्या अभंगवाणीचे पारायण
तळेगाव दाभाडे :
संत तुकाराम महाराज यांची साधनाभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे दरवर्षीप्रमाणे माघ शुद्ध दशमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव तथा बाळासाहेब काशीद यांनी दिली.या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशमधूनही मोठ्या संख्येने भाविक भंडारा डोंगरावर येतात. ट्रस्टच्या वतीने सप्ताहास येणाऱ्या भाविकांची निवास व भोजन व्यवस्था मोफत केली जाते. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी दिवसभर महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. दररोज पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी सात ते बारा आणि दुपारी दोन ते चार गाथा पारायण, सायंकाळी साडेचार ते सहा या दरम्यान
‘संत तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती’, सहा ते सात हरिपाठ, रात्री आठ ते दहा कीर्तन , रात्री
अकरा ते पहाटे चार जागर असे कार्यक्रम होणार आहेत.
रविवारी (दि.२) ते शनिवारी (दि .८) या दरम्यान रात्री आठ वाजता अनुक्रमे यशोधन महाराज साखरे (आळंदी), ॲड.जयवंत महाराज बोधले (पंढरपूर), उद्धव महाराज मंडलिक (नेवासा), चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर), एकनाथ आबामहाराज वासकर (पंढरपूर), महंत नामदेवशास्त्री सानप (भगवानगड) व ज्ञानेश्वर माऊली कदम (आळंदी) यांची कीर्तन सेवा होणार आहे.
रविवारी (दि.९) सकाळी १० ते १२ या दरम्यान
डॉ. सुदाम महाराज पानेगावकर (आळंदी) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच २ ते ८ फेब्रुवारी अखेर सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचा ‘संत तुकोबांची हृदय स्पंदने – एक अनुभूती’ हा अभंग चिंतनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे ट्रस्टचे विश्वस्त हभप रवींद्र महाराज ढोरे यांनी सांगितले.
असा असेल माघ शुद्ध दशमीचा सोहळा
सप्ताहातील माघ शुद्ध दशमीच्या दिवशी शुक्रवारी( दि.७) दुपारी बारा ते दीड या दरम्यान प्रा. गणेश शिंदे व गायिका सन्मिता धापटे (शिंदे) यांचा संत तुकाराम महाराजांचे जीवनावरील ‘तुका आकाशा एवढा’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. दुपारी दीड ते चार दरम्यान डॉ. भावार्थरामचंद्र देखणे व ३५ सहकारी यांचे बहुरूपी भारुड कलेचे सादरीकरण होणार आहे. तसेच दररोज सकाळी सहा वाजता सर्व रोग निवारणासाठी डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचा ‘सर्व श्रेष्ठ अभंग उपचार सहयोगाचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री महंत नामदेव शास्त्री सानप यांचे कीर्तन होणार आहे,अशी माहिती संयोजकांनी दिली.