भारतातील शेती उद्योग जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहचू – हर्षवर्धन पाटील ‘ॲग्रीवाईस – २४’ राष्ट्रीय परिषद पीसीईटीच्या पुणे बिझनेस स्कुलमध्ये संपन्न; देशभरातील पाचशे संस्थांमधील नऊशे प्रतिनिधींचा सहभाग

पिंपरी, पुणे (दि. २२ मार्च २०२४) भारतात शेती व्यवसाय आजही उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय ठेवले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन शेती धोरणामुळे २०४७ पर्यंत भारतातील शेती उद्योग जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहचू, असा विश्वास नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पुणे पब्लिक स्कूल (पीबीएस) च्या वतीने ‘ॲग्री वाईस २४’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.यावेळी दीपक फर्टिलायझर्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्स लि. चे सहयोगी उपाध्यक्ष मनिष गुप्ता, जे. के. सीडसचे व्यवस्थापक किशोर अहिरे, पीबीएसचे प्राचार्य डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी आदी उपस्थित होते. देशभरातील पाचशे संस्थांमधील नऊशे विद्यार्थी, प्रतिनिधी सहभागी झाले होते.

सध्या शेतकरी शेतीमाल उत्पादन करताना रासायनिक खते, कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. परंतु याचा विपरित परिणाम पिकांवर होऊन उत्पादन कमी होते. शेतकऱ्यांनी शाश्वत, नैसर्गिक शेती केली आणि एक उद्योग म्हणून याकडे पाहिले तर अधिक उत्पादन आणि चांगला नफा मिळू शकतो.‌ त्यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे, असे किशोर अहिरे यांनी सांगितले.

भारतात सरासरी ८७ टक्के पाणी शेतीसाठी, अकरा टक्के पाणी दैनंदिन वापरासाठी तर दोन टक्के पाणी औद्योगिक क्षेत्राला वापरले जाते. म्हणजेच शेतीसाठी पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. तसेच रासायनिक खते मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मात्र त्या प्रमाणात शेतमालाचे उत्पादन होत नाही. पाणी आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरला आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला पाहिजे. माती परीक्षण करून कोणती पिके घ्यावीत याविषयी माहिती घेतली पाहिजे, असे मनिष गुप्ता यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान सकाळच्या सत्रात पशुसंवर्धन सहआयुक्त शितलकुमार मुकणे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कोरोमंडल इंटरनॅशनल लि. चे सहयोगी उपाध्यक्ष जितेंद्र कोळपे, पीआय इंडस्ट्रीज लि.चे उपव्यवस्थापक प्रवीण जाधव, महिको चे राष्ट्रीय विक्री व्यवस्थापक श्रीकांत शिवले यांनी शेती उद्योगातील नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, विविध प्रश्न, अडचणी, सुधारित बियाणे आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. आभार डॉ. मीनाक्षी त्यागी यांनी मानले.

चौकट –

साखर उद्योगाची ओळख ऊर्जा उद्योग म्हणून होईल – हर्षवर्धन पाटील

 

भारतात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन होते. ऊसापासून साखर निर्मिती केली जाते. जागतिक पातळीवर साखर उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. परंतु विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात खूप संशोधन होत आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे साखर उद्योगातही फार मोठे बदल होत आहेत. ऊसाच्या मळी पासून इथेनॉल निर्मिती करून त्याचा वापर जैव इंधन म्हणून तसेच ऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो. पुढील काळात हे नवीन तंत्रज्ञान भारतात आणून ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी सरकारकडून पुढील धोरण आखण्यात येत आहे. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था मिळून ऊर्जा उद्योग म्हणून नवी ओळख निर्माण होईल असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

——————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page