विद्यार्थ्यांच्या रोजगार प्रशिक्षणासाठी ASM संस्थेचा सामंजस्य करार विद्यार्थ्यांना मोफत संरचित प्रशिक्षण : डॉ. व्ही. पी. पवार
चिंचवड, 4 जून :. विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविणे तसेच शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ASM इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च (IBMR) च्या एमसीए विभागाने पुणे येथील ITpreneur Edutech संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारांतर्गत विद्यार्थ्यांना सध्याच्या उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार प्रशिक्षण देण्यासाठी कॅम्पस एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्यात येणार असल्याची माहिती एमसीए विभागाचे संचालक डॉ. व्ही. पी. पवार यांनी दिली.
दोन्ही संस्थांदरम्यान हा सामंजस्य करार औपचारिकरित्या करण्यात आला. डॉ. पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असलेली दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच कॉर्पोरेट क्षेत्रात आवश्यक असलेली व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून उद्योगाभिमुख व्यावहारिक प्रशिक्षण तितकेच महत्त्वाचे बनले असल्याचे त्यांनी नमूद केले.
ASM समूहाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांनी सांगितले की, हा करार शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यात मजबूत संबंध निर्माण करण्याच्या ASM च्या व्यापक उपक्रमाचा भाग आहे. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार तयार करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना 15 तासांचे संरचित प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि नव्या आयटी तंत्रज्ञानावर आधारित तीन विशेष तांत्रिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगार तयारीसाठी तीन एचआर सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये रेझ्युमे लेखन, मुलाखत तयारी, संवाद कौशल्य, सादरीकरण कौशल्य आणि कॉर्पोरेट शिष्टाचार यांसारख्या विषयांचा समावेश असेल.
एमसीए विभागप्रमुख मिलिंद देशकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रासाठी तयार करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी महत्त्वाचे पाऊल आहे. सध्याच्या आयटी क्षेत्रात तांत्रिक कौशल्यासोबत आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक मानला जातो. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव, करिअर मार्गदर्शन आणि थेट रोजगार संधी मिळणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी तीन विशेष कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्रोजेक्ट मॅनेजरची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
चौकट :
“ASM IBMR च्या एमसीए विभागातील विद्यार्थी विवेक रावल याची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड होऊन त्याने संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. एमसीएच्या दुसऱ्याच सत्रात मिळवलेले हे यश त्याची तांत्रिक क्षमता, मेहनत आणि समर्पण दर्शवते. विवेकचे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.”
— डॉ. व्ही. पी. पवार, संचालक, ASM समूह






