७ जुलैला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर कडे प्रस्थान करणार
देहू : मान्सूनच्या पहिल्या सरींनी महाराष्ट्राला स्पर्श करताच वारकरी संप्रदायाच्या मनात पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची आस अधिकच दाटून आली आहे. ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आषाढी वारीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
आषाढी एकादशी यंदा २५ जुलै २०२६ रोजी साजरी होत असल्याने राज्यभरातील वारकरी दिंड्यांची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे. देहू नगरीतील मुख्य देऊळवाड्यातून जेष्ठ वद्य सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा हा ऐतिहासिक सोहळा भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाच्या वातावरणात मार्गस्थ होणार आहे.
वारीच्या पार्श्वभूमीवर देहूतील तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, संस्थान प्रशासन आणि वारकरी प्रतिनिधी विविध नियोजन बैठकींमध्ये व्यस्त आहेत. लाखो भाविकांच्या सहभागामुळे यंदाही पालखी मार्गावर भक्तीचा महासागर उसळण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, यंदाच्या पालखी सोहळ्याचे सुयोग्य सनियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची ‘पालखी सोहळा प्रमुख’ म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांवर संपूर्ण सोहळ्याच्या नियोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय, पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण असलेल्या पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी देवस्थानतर्फे तीन विशेष बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. सजविलेल्या या बैलजोड्या यंदाच्या वारीत प्रथमच सहभागी होणार असून, सोहळ्याच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.
तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाची अधिकृत घोषणा होताच राज्यातील वारकरी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सर्वांचे लक्ष आळंदीकडे लागले असून, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या घोषणेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विठ्ठलभक्तांच्या हृदयात पुन्हा एकदा पंढरीच्या वाटेवरील भक्ती, समर्पण आणि नामस्मरणाचा महोत्सव साकार होण्याची चाहूल लागली आहे.






