मावळ परिसरात अंमली पदार्थविरोधी कारवाईला गती; दोन छाप्यात गांजा विक्रेत्यांना अटक
मावळ:
मावळ तालुका व परिसरात लपूनछपून सुरू असलेल्या अवैध अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाच्या प्रकारांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम हाती घेतली असून, शनिवारी (दि. ६) दिवसभरात दोन ठिकाणी धडक कारवाई करून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली.
पहिली कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत करण्यात आली. धर्माजी सोपान बधाले (वय ७८) या वृद्ध व्यक्तीकडे अवैधरित्या गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवलाख उंब्रे बधलवाडी येथे छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान संशयिताच्या ताब्यात १०,००० रुपये किमतीचा २०० ग्रॅम गांजा मिळाला. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएनएसएस ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, दुसरी कारवाई देहुरोड पोलिसांनी केली. बंगळूर–हायवेवरील चर्चजवळील बस स्टॉप परिसरात संशयित व्यक्ती थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच धाव घेत अनील जगन्नाथ बोरसे (वय ४९, रा. आंबेडकर नगर, देहुरोड) याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील पिशवीत १,५५० रुपये किमतीचा ११९ ग्रॅम गांजा आढळला. एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मावळ तालुक्यात अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. युवकांमध्ये व्यसनाची वाढ रोखण्यासाठी आणि अवैध विक्रेत्यांचे जाळे मोडून काढण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.






