आळंदीतील सर्पमित्र राहुल स्वामीचा सर्पदंशाने मृत्यू
आळंदी : आळंदी येथील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी ( वय ३२ वर्षे ) यांचा सर्पदंश झाल्याने उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सर्पास सुरक्षित जंगलात सोडण्यास जात असताना दुर्दैवी घटना घडली. यामुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे मागे आई, बहीण असा परिवार आहे.
स्वामी यास सर्पदंश झाल्याने लगेच आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारास आणण्यात आले. येथे प्राथमिक उपचार आणि लशीकरणं करीत अधिकचे उपचारास वायसीएम रुग्णालयात न्यावे लागले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोब्रा जातीचा साप सोडत असताना त्याला सापाचा दंश झाला. त्यांच्या हाताला दंश झाला. तात्काळ उपचार मिळाले असते तर सर्प मित्राचा जीव वाचला असता असे स्थानिक नागरिक सांगतात. आळंदी पंचक्रोशीत राहुल सर्प मित्र म्हंणून सर्व परिचित होता. आळंदी येथील सर्व सामान्य कुटुंबातील सेवाभावी कार्यकर्त्यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्वामी कुटुंबावर कोसळलेले दुःख सावरण्याची शक्ती मिळावी अशी अनेकांनी शोक व्यक्त करीत युवक तरुणांनी स्वामी कुटुंबास मदत करण्याचे आवाहन केले असून यास प्रतिसाद आळंदीकर नागरिकांनी दिला असून जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.