‘जर्मन भाषा गुरु’ हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त — विलास भेगडे आकुर्डी येथे पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला
तळेगाव दाभाडे:

‘जर्मन भाषा गुरु’ हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, परदेशी भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी हे मार्गदर्शक ठरेल. सर्वांनी हे पुस्तक वाचावे आणि त्याचा उपयोग करावा, असे आवाहन तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष, पत्रकार विलास भेगडे यांनी केले.
करियर हब टेक्नॉलॉजीचे संस्थापक, प्राचार्य कैलास गाढे यांच्या ‘जर्मन भाषा गुरु’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आकुर्डी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप पांडुरंग देशमुख (डी. वाय. पाटील विद्यापीठ, आंबी, पुणे), समाजसेवक चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, विजय पाटील, गोविंद पाटील, तसेच विशेष अतिथी म्हणून लोकमत पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ उपसंपादक योगेश्वर माडगूळकर उपस्थित होते.
आपल्या मनोगतात योगेश्वर माडगूळकर यांनी सांगितले की, “‘जर्मन भाषा गुरु’ हे पुस्तक वाचनीय असून, गाढे सरांनी जर्मन भाषा शिकवताना मराठीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे विद्यार्थी परकीय भाषा शिकतानाच मातृभाषेचा अभिमानही जपत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
मुख्य पाहुणे डॉ. दिलीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि योग्य मार्गदर्शनाने मिळविलेले यश हे शिक्षकांसाठी अभिमानास्पद आहे,” असे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यात करियर हब टेक्नॉलॉजीच्या शिक्षकवर्गातील श्वेता गाढे , गणेश आनेराये , कृष्णाकांत सरनाईक , अनिकेत सूर्यवंशी उपस्थित होते. समारोप प्रसंगी प्राचार्य कैलास गाढे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि “‘जर्मन भाषा गुरु’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण व करिअर घडविण्यासाठी दिशादर्शक ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला.






