मंदिर पुनर्निर्माणात चपेटदान मुद्रेतील ऐतिहासिक हनुमान मूर्ती बधलवाडी येथे उजेडात
मावळ :
मावळ तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. प्राचीन कालखंड, मध्ययुग ते अर्वाचिन काळापर्यंत अनेक बारवा, समाधी, शिलालेख, लेणी, दुर्ग व मंदिरे मोठ्या प्रमाणावर येथे निर्माण झाल्याचे दिसून येते. मावळात नव्याने एखादं लेण समोर येते तर कधी एखादी समाधी किंवा मंदिर समोर येते कारण ऐतिहासिक वारसा या भूमिला मोठ्या प्रमाणावर लाभलेला आहे.
मावळातील नवलाखउंब्रे गाव हे शिवकालीन इतिहासाचे बोलके साक्षीदार आहे. या गावी ऐतिहासिक भैरवनाथ मंदिर, भव्य नगारखाना, आंग्लकालीन राम मंदिर, शिवकालीन पानवठ्यांमध्ये पायऱ्यांची विहीर – तळे, खापराच्या पाणी वाहून नेण्याच्या खापरी नळाच्या योजना, तेलाचे घाणे, समाधी, रंगशीला, दिपमाळा व बाजारपेठ अशा नानाविध ऐतिहासिक वारशाने नवलाखउंब्रे हे गाव समृद्ध आहे. शिवकालीन बाजारपेठेचे गाव म्हणून मान्यता पावलेल्या या गावाशेजारी अनेक वाड्या वस्त्या कालौघात वसल्या. त्यातील एक बधलवाडी होय. येथील हनुमान मंदिराचे पुनर्निर्माण करतेवेळी पाया घेताना जमिनीच्या 7 – 8 फूट खाली जुनी मारुती मूर्ती समोर आली. याची माहिती सर्वप्रथम स्थानिक मंडळीतील श्री.रवी कडलक, श्री.सोपान दहातोंडे व श्री.सचिन रौधळ यांनी डॉ.बोराडे यांना दिली तसेंच संशोधनाकरिता मौलिक सहकार्य केले.
सदर हनुमान मूर्ती चपेटदान मुद्रेतील आहे. चापटी मारण्याचा पवित्रा घेतलेल्या मूर्तीला चपेटदान मुद्रा असे संबोधले जाते. सदर मूर्ती कुठेही भंग पावलेली भग्न वा खंडित नाही. जमिनीखाली किमान 100 वर्षे राहिल्याने तिची फारशी झीज झालेली नाही. अखंड शिळेवर कोरलेली ही मूर्ती अडीच फूट उंच असून मिशिधारी दर्शविलेली आहे. दोन्ही हातात कडे व बाजूबंद, गळ्यात कंठा, दोन्ही पायात तोडे व कमरेला सोवळे सदृश्य शेला आहे. शक्ती – सामर्थ्य व विजयाचे प्रतीक म्हणून पायाखाली पनवती दर्शविली आहे. हिस लंकीन किंवा पनवती दोन्ही संबोधले जाते. महत्वाच्या कामास जाताना मारुतीस जाण्याचं कारण हे की मागची पनवती निघून जावी अशी समाज धारणा आजपर्यंत टिकून आहे. ही मूर्ती साधारण पाऊणे दोनशे वर्षे जुनी असल्याचे प्राथमिक संशोधनातून समोर आले आहे. 1850 च्या दरम्यान याची निर्मिती संभवते. याबाबत मूर्तीशास्र विषयातील जेष्ठ इतिहासकारांची मते देखील तपासण्यात आली आहेत. मूर्तिच्या गुणवैशिष्ठ्यात सुबकता, देखणेपणा विशेष जाणवतो.
कसबे नवलाख उंब्रे हे प्रांत जुन्नर सुभा पुणे अंतर्गत मध्ययुगात मोठ्या नावारूपाला आलेला कसबा होते. येथील मूळ पाटीलकी पापळ यांजकडे होती. पुढील काळात निमी पाटीलकी येशवंतराव दाभाडे सेनापती यांनी खरेदी घेतली होती असे अस्सल मोडी कागदपत्रांत नमूद आहे. पापळ पाटील यांचा प्रथम लिखित शिलालेखातील उल्लेख 1760 – 61 साली कर्वे – उपाध्ये निर्मित बारवांवर आढळला. याचे प्रथम वाचन व अन्वयार्थ प्रस्तुत लेखक डॉ.प्रमोद बोराडे व श्री.दीपक पटेकर यांनी केले होते. हा शिलालेख करंजगाव – ब्राम्हणवाडी येथील ऐतिहासिक पानवठा अर्थात पायऱ्यांची बारव यावर आढळला. यात माणकोजी पापळ हे व्यक्तींनाम समोर आले आहे. राम मंदिराच्या करिता पेशवे सरकारातून जमीन इनाम दिली असल्याचे पुरावे आहेत. राम मंदिराच्या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून या उत्सवाबाबतच्या इनामाची सनद सरकारातून सिवजी बाबा गुरव याजला देण्यात आली होती हे दस्तामधून निदर्शनास येत आहे. सारांश नवलाखउंब्रे गावास ऐतिहासिक वारसा मोठ्या प्रमाणात लाभला असून नव्याने येथील अनेक आडनावे, जुनी घराणी व वास्तू समोर येत आहेत. मोडी लिपितील कागदपत्रे या परिघात कुणाकडे असतील त्यांनी संशोधकांना अभ्यासाकरिता उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन प्रस्तुत लेखकाकडून करण्यात येत आहे…
इतिहास संशोधक
डॉ.प्रमोद बोराडे
9822717447






