*अभ्यासातील सातत्य आणि शिस्त हे तुम्हाला यशाकडे घेऊन जातात – कार्तिक मधिरा*
तळेगाव दाभाडे : दि. 07 ऑगस्ट इनर्व्हील क्लब व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात UPSC आणि आर्मी मधील नोकरीच्या संधीचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना करण्यात आले. अभ्यासातील सातत्य आणि शिस्त हे यशासाठी महत्त्वाचे असून विद्यार्थिनींनी नकारात्मक विचारांच्या व्यक्तींकडे लक्ष न देता यशाकडे लक्ष केंद्रित करावे असे (ASP) कार्तिक मधिरा म्हणाले. वाईट गोष्टी पासून दूर राहण्यासाठी आणि अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी विद्यार्थिनींनी खेळ, व्यायाम, ध्यान, योगा या कडे लक्ष देऊन स्वतःचे मानसिक आरोग्य सकारात्मक बनवावे. पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होत असते यातील पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या लेखी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थिनींनी अभ्यासात सातत्य व सकारात्मकता ठेवणे गरजेचे असते असे सांगून मुलाखत म्हणजे एक व्यक्तिमत्त्वाची व बुद्धिमत्तेची परीक्षा असते. तुमचा आत्मविश्वास हे तुमचे व्यक्तिमत्व सांगून जाते त्यामुळे स्वतःला सतत तयार ठेवा असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीहरी मिसाळ यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले महाविद्यालय समाजकार्य करत असून मावळातील सर्व मुलींना उच्च शिक्षण मिळावे म्हणून महाविद्यालय सतत प्रयत्न करत आहे. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र कार्यरत आहे. महाविद्यालयाला बारा वर्षे पूर्ण झाले असून नॅक मूल्यांकनात ‘बी’ ग्रेड प्राप्त केलेला आहे. राज्य सरकारने महाविद्यालयाला यावर्षी पासून एम. कॉम ची मान्यता दिली असून केजी पासून पीजी पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली देणारी ही संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सचिव मा. श्री यादवेंद्रजी खळदे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ग्रुप कॅप्टन वाय. जे. साठे यांनी विद्यार्थिनींना आर्मी नेव्ही आणि वायुसेना या तिन्ही दलामध्ये मुलींना नोकरीच्या संधी या विषयाचे सविस्तर मार्गदर्शन केले. 1996 पासून महिलांना सैन्यातील वरील तिन्ही दलातकाम काम करण्याची संधी उपलब्ध झाली. असे त्यांनी सांगितले बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर मुलींना सैन्यात सेवेची संधी मिळते. एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट मिळालेल्या मुलींना सेवेची सरळ संधी मिळते असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ प्रवीण साठे होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात इनर्व्हील क्लब कडून केल्या जाणाऱ्या विविध कार्याची माहिती दिली इनर्व्हील ही एक जागतिक पातळीवर 104 देशांमध्ये जवळजवळ 4000 शाखांमधून कार्यकरत असणारी बिगर सरकारी महिला संघटना आहे या संघटनेतून मैत्री वृद्धिंगत करून आपुलकीच्या भावनेतून सेवा दिली जाते. कार्यक्रमात इनर्व्हील क्लब तळेगाव दाभाडेच्या पदाधिकारी संगिता जाधव, ज्योती जाधव, निलिमा बारटक्के, काजल गारोळे, जयश्री दाभाडे, मुग्धा जोर्वेकर आणि संगिता शेडे तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रश्मी थोरात यांनी केले.