तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; ३० किलो प्लास्टिक जप्त, सात जणांवर कारवाई

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ शहर अभियानाला बळ देण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने प्लास्टिकविरोधी धडक मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला. स्टेशन परिसरातील नगरपरिषद रोड आणि चाकण रोड भागात करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत फळ विक्रेते व दुकानदारांकडे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी एकूण सात विक्रेते व दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे ३० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

 

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने सकाळपासूनच विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी ग्राहकांना प्लास्टिक पिशव्यांमधून साहित्य देण्यात येत असल्याचे आढळून आले. शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाचे उल्लंघन होत असल्याने संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून भविष्यातही अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Advertisement

 

ही विशेष मोहीम तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे(पाटील)आरोग्य सभापती निखिल भगत आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करण्याचे आवाहन करत नागरिक आणि व्यावसायिकांनी प्लास्टिकमुक्त तळेगाव घडविण्यास सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

कारवाई पथकात आरोग्य विभाग प्रमुख अभिषेक शिंदे, दत्तात्रय ढवळे, स्वच्छता निरीक्षक सुनील काळकुटे, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे, शुभम चौकटे तसेच वाहन चालक संतोष दाभाडे यांचा सहभाग होता. पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने परिसराची पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांची नोंद घेत कारवाई पूर्ण केली.

 

दरम्यान, प्लास्टिकमुळे पर्यावरण, जलनिस्सारण व्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने व्यापारी व नागरिकांना पुनर्वापर करता येणाऱ्या कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टिकविरोधी मोहिमेला आणखी तीव्र स्वरूप देत शहरातील विविध भागांत अचानक तपासण्या करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे प्लास्टिक वापरणाऱ्यांनी वेळीच सवय बदलावी, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा नगरपरिषदेने दिला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page