नगरपरिषदेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत द्यावी; जीतूभाई टेलर
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमिक शाळांमधून एस.एस.सी. परीक्षेत
उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येकी पहिल्या पाच विद्यार्थ्यांना (एकूण १५) इयत्ता ११ वी व १२ वीच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याची मागणी माजी शिक्षण मंडळ सभापती जीतूभाई टेलर (कल्याणजी) यांनी नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, नगरपरिषदेच्या शाळांतील अनेक विद्यार्थ्यांचे पालक मजुरी व अल्प उत्पन्नाच्या व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ११ वी व १२ वीच्या शिक्षणाचा खर्च पेलणे त्यांना कठीण जाते आणि अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहतात.
नगरपरिषदेने अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केल्यास त्यांचे शिक्षण सुरू राहण्यास मदत होईल, पालकांवरील आर्थिक ताण कमी होईल तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. या उपक्रमासाठी मोठ्या निधीची आवश्यकता नसून अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद केल्यास तो राबविता येईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण, बेरोजगारी आणि सामाजिक समस्यांच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी टेलर यांनी केली आहे.






