डॉ.बाबासाहेब आंबेडकर नव्या जगाचा सक्सेस पासवर्ड-प्रा.आर.आर. डोके
तळेगाव दाभाडे :

सालाबादप्रमाणे याही वर्षी महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज सुकुल सोसायटी व औरा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुकुल सोसायटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगरीचे विद्यमान *उपनगराध्यक्ष मा. श्री. गणेशभाऊ काकडे* उपस्थित होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, बहुआयामी कार्य आणि धम्मचक्र प्रवर्तन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले:
*संघर्षमय बालपण:* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत अन्यायकारक परिस्थितीचा आणि सामाजिक विषमतेचा सामना करत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
*जातीयवादाचे चटके:* शाळेत गणिताचे कोडे सोडवण्यासाठी फळ्याकडे जाताना, सवर्णांच्या डब्यांचा स्पर्श होऊ नये म्हणून त्यांना रोखण्यात आले होते, ही घटना तत्कालीन कटू वास्तव दर्शवते.
*उच्च शिक्षणासाठी साहाय्य:* छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या मोलाच्या मदतीमुळेच बाबासाहेबांना कोलंबिया आणि लंडन येथे जाऊन उच्च शिक्षण घेणे शक्य झाले.
*बहुआयामी व्यक्तिमत्त्व:* बाबासाहेब केवळ राज्यघटनेपुरते मर्यादित नसून ते एक उत्तम अर्थतज्ज्ञ, पत्रकार, कायदा व कामगार मंत्री आणि एक प्रगल्भ राजकीय पुढारी होते.
*सामाजिक आणि राजकीय कार्य:* त्यांनी मजुरांच्या आणि वंचितांच्या हक्कांसाठी ‘मजूर पक्ष’ व ‘रिपब्लिकन पार्टी’ची स्थापना केली, तसेच १९५१ मध्ये ‘हिंदू कोड बिलाच्या’ माध्यमातून महिलांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी मोठा लढा दिला.
*धर्मांतराची घोषणा:* दलितांना अन्यायकारक व्यवस्थेतून मुक्त करण्यासाठी त्यांनी १९३५ साली येवला येथे ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी ऐतिहासिक घोषणा केली.
*बौद्ध धम्माचा स्वीकार:* १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’चा मार्ग निवडला.
*धम्माची शिकवण:* भगवान बुद्धांचा मार्ग हा प्रज्ञा, शील आणि करुणेचा असून, त्यात सर्वांसाठी समता आणि बंधुतेचा संदेश सामावलेला आहे.
*बौद्ध साहित्याचा प्रभाव:* महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात करत असताना कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांनी भेट दिलेल्या भगवान बुद्धांच्या चरित्रामुळेच बाबासाहेबांवर बुद्ध विचारांचा सखोल प्रभाव पडला होता.
*सद्यस्थितीवर परखड भाष्य:* आज केवळ डीजे लावून आणि नाचगाणी करून जयंती साजरी करण्यापेक्षा, बाबासाहेबांचे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे विचार व पंचशीलाचे तत्त्व आचरणात आणण्याची समाजाला नितांत गरज आहे, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी लहान मुलांनी आणि महिलांनी सुमधुर गीतातून बाबासाहेबांचे विचार सर्वांसमोर मांडले. तसेच श्री संजय ठाकर, श्री अंकुश येवले यांनीही आपले डॉ. आंबेडकरांविषयी विचार मांडले.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते *प्रा. आदरणीय श्री. राजाराम डोके सर* यांनीही उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आणि जागतिक कार्याचा जागर मांडला:*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचेच नव्हे तर *आधुनिक जगाचे ‘सक्सेस पासवर्ड’* असून, आज १६० पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा सन्मान केला जात आहे.
तळेगाव दाभाडे आणि मावळ परिसराशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत जवळचा संबंध होता; त्यांनी येथे शिक्षणाच्या प्रसारासाठी विद्यापीठ उभारण्याच्या उद्देशाने तळेगाव, वडगाव आणि कातवी परिसरात जमिनी घेतल्या होत्या.
म्यानमार मधील रंगून शहरात बौद्ध धर्म परिषदेत भगवान बुद्धांच्या ज्या दोन मूर्ती त्यांना मिळाल्या होत्या, त्यापैकी एक मूर्ती बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने *देहूरोड येथील बुद्ध विहारात* स्थापित केली असल्याने तेथील बुद्ध विहारास विशेष स्थान आहे.
अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची जागतिक स्तरावर मोठी ओळख असून, कोलंबिया विद्यापीठाने आपल्या २५० वर्षांच्या इतिहासातील १०० सर्वोच्च आणि सर्वात बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत त्यांना *प्रथम स्थान* दिले आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा उभारलेला आहे आणि खाली वाक्य लिहिले आहे (symbol of knowledge)
त्यांनी आपल्या आयुष्यात ‘बॅरिस्टर ॲट लॉ’ वगळता इतर सर्व ३२ उच्च पदव्या या *अर्थशास्त्रामध्ये* मिळवल्या होत्या, जे त्यांच्या अफाट शैक्षणिक समर्पणाचे प्रतीक आहे.
अमेरिका आणि इंग्लंडसारख्या प्रगत देशांत नागरिकांना *मतदानाच्या अधिकारासाठी प्रदीर्घ संघर्ष* करावा लागला, मात्र बाबासाहेबांनी भारतीय संविधानातून विनासंघर्ष स्त्री-पुरुष समानतेसह सर्वांना मतदानाचा समान अधिकार मिळवून दिला.
देशाच्या पायाभूत उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान असून, भाक्रा नांगल, हिराकुंड आणि चंबल नदीवरील धरणांसारख्या मोठ्या प्रकल्पांचे *आर्किटेक्चर* आणि नियोजन त्यांनीच केले होते.
*वित्त आयोगाची (Finance Commission)* संकल्पना आणि केंद्र व राज्यांत निधीचे वितरण कसे असावे, याचा मूलभूत आर्थिक विचार देशाचे पहिले कायदेमंत्री असलेल्या बाबासाहेबांनीच मांडला होता.
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्याचा प्रश्न नव्हता, तर निसर्गाच्या संपत्तीवर सर्व मानवांचा आणि प्राणिमात्रांचा समान हक्क प्रस्थापित करण्यासाठीचा तो एक ऐतिहासिक लढा होता. सत्याग्रह करताना बाबासाहेब म्हणतात हा सत्याग्रह मी अन्यत्र कुठेही घेऊ शकलो असतो परंतु ही रयतेच्या राजाची भूमी आहे.म्हणून आमचा शाहीर म्हणतो दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या चवदार तळ्यावर.
*’शिकवा, चेतवा आणि संघटित व्हा’* या त्यांच्या मंत्राचा अवलंब करत, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे असे बाबासाहेब म्हणतात.आजच्या तरुण पिढीने बाबासाहेबांचा हा वैचारिक वारसा केवळ राजकारणापुरता मर्यादित न ठेवता शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेण्याची नितांत गरज आहे.
भारत ,पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र एकाच वेळी निर्माण झाली.परंतु अल्ला,आर्मी,अमेरिका यांच्या विळख्यामध्ये पाकिस्तान उध्वस्त झाला. भारत देश मात्र दिमाखात झेपावला. याचे कारण भारताचा केंद्रबिंदू होता तो म्हणजे “आम्ही भारताचे लोक”(we the people of India) 25 नोव्हेंबर 1949 च्या भाषणात बाबासाहेब म्हणतात.एक वेळ अशी येईल येथील राजकीय नेते,पक्ष,श्रीमंत उद्योजक, प्रसार माध्यमे सगळे विसरतील, विकलेही जातील. तरी सुद्धा माझ्या देशामधील लोकशाही सुरक्षित राहील.कारण माझा भरोसा अन्य कोणावरही नाही.माझ्या भरोसा येथील सर्वसामान्य जनतेवर आहे म्हणून भारताचे संविधान तयार झाल्यावर ते भारतीय लोकांना अर्पण केले. म्हणून बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विचारांचा वारसा आपण पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. असे मनोगत प्रा. डोके सर यांनी व्यक्त केले.
अशा या अनोख्या पद्धतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुल व औरा सोसायटीतील सर्व आयोजक — श्री. कांबळे सर, श्री. सोनवणे काका, श्री. चवरे सर, श्री. भगत सर, सौ. संध्या जाधव ताई, सौ. गायकवाड ताई, सौ. चवरे ताई, श्री. अमित जाधव सर, श्री. धनावडे सर आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रमेश सोनवणे तर आभार श्री.महेश कोरी यांनी मानले.






