कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालयात ‘केमोनारा-समारोप २०२६’ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Oplus_16908288

इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे ‘केमोनारा-समारोप २०२६’ तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

 

कार्यक्रमास इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या खजिनदार सौ. निरूपा कानिटकर तथा संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शैक्षणिक, क्रीडा आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

 

प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशस्वी आयुष्यासाठी वेळेचे योग्य नियोजन, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच संस्थेच्या खजिनदार सौ. निरूपा कानिटकर यांनी विद्यार्थ्यांनी जीवनातील आव्हाने स्वीकारत नकार पचविण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यास संस्था सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनाच संस्थेची खरी संपत्ती संबोधत त्यांनी सांगितले की, काही वर्षांनंतर हेच विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाल्यानंतर महाविद्यालयाला भेट देतील आणि त्यावेळी ‘हा आमचा विद्यार्थी आहे’ असे अभिमानाने सांगण्याचा आनंद संस्थेला लाभेल. समारोपाच्या या क्षणी विद्यार्थ्यांच्या मनात अनेक भावनिक आठवणी दाटून आल्या असतील, मात्र आता ते जीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत असून नव्या संधी, अनुभव आणि आठवणी निर्माण करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व सहशैक्षणिक क्षेत्रातील वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि व्यावसायिक मूल्ये यांचा समतोल साधत फार्मसी क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिनिधिक मनोगत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले.

 

समारंभास फार्मसी विभागातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वेदिका चोरगे व कु. दिव्या कलावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गुलाब शिंदे यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी प्रा. अश्विनी जोशी, प्रा. श्वेता मंत्री व प्रा. महेश गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदास काकडे, कार्यवाह मा. श्री. चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष मा. श्री. शैलेश शहा, उपाध्यक्ष मा. श्री. संजय साने व सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page