नूतन इन्क्युबेशन सेंटरच्या विकासासाठी एसटीपीची भेट नवोपक्रम, संशोधन व उद्योजकतेसाठी सहकार्यावर चर्चा
तळेगाव दाभाडे :
नूतन इन्क्युबेशन सेंटर (एनआयसी)च्या पुढील विकासासाठी तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा विविध उपक्रमांमधील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन इन्क्युबेशन सेंटरला भेट दिली. यावेळी उद्योजकता विकास, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे, एसटीपीचे अध्यक्ष तथा निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप बंड, ऑटोफिना रोबोटिक्सचे संचालक परेश पारेख, महाराष्ट्र शासनाचे माजी राज्य मंत्री, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व नूतन इन्क्युबेशन सेंटरचे संचालक संजय (बाळा) भेगडे, संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, संस्थेचे खजिनदार, अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन आणि नूतन इन्क्युबेशन सेंटरचे संचालक राजेश म्हस्के तसेच विश्वस्त गणेश खांडगे, रामदास काकडे उपस्थित होते.
या भेटीचे आयोजन व यजमानपद नूतन इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुजाहिद शेख आणि नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी)चे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी केले.
भेटीदरम्यान नूतन इन्क्युबेशन सेंटरच्या भविष्यातील विकास आराखड्यावर सखोल चर्चा झाली. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या तांत्रिक, संशोधन व उद्योजकता विकास क्षेत्रातील अनुभवाचा लाभ एनआयसीला कसा मिळू शकतो, याबाबत विविध मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले.
विद्यार्थी, संशोधक आणि नवउद्योजकांना अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त उपक्रम, तज्ज्ञ मार्गदर्शन, तंत्रज्ञान हस्तांतरण, स्टार्टअप्सना सहाय्य तसेच नवोपक्रमाला चालना देणाऱ्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक चर्चा झाली. या भेटीमुळे नूतन इन्क्युबेशन सेंटर आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होऊन परिसरातील उद्योजकता व नवोपक्रम परिसंस्थेला मोठी बळकटी मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.






