इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठेवले दुखितांचे स्मरण — पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
तळेगाव दाभाडे —

इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक विशेष डोनेशन ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. अवकाळी पावसामुळे जीवन उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांसाठी विद्यार्थ्यांनी आत्मीयतेने पुढाकार घेतला.
“एक हात मदतीचा, एक हात मानवतेचा” या ब्रीदवाक्याशी सुसंगत अशी ही उपक्रमशीलता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी एकदिलाने दाखवली. शेतकऱ्यांच्या दुःखाला आपल्या मदतीच्या हातांनी हातभार लावण्याच्या उद्देशाने अनेकांनी रोख रक्कम स्वरूपात निधी संकलन केले.
या उपक्रमात स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. NSS स्वयंसेवकांनी तळेगांव परिसरात घरोघरी जाऊन जनजागृती केली आणि समाजातील विविध स्तरांतील लोकांना या सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले, “समाजप्रेम आणि उत्तरदायित्व या मूल्यांची पेरणी शिक्षण संस्थांमधून व्हायला हवी, आणि आपल्या विद्यार्थ्यांनी याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.”
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी राबवलेल्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे आणि कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या या भावनिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश देवढे आणि प्रा.प्रियांका रोकडे यांनी ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये महाविद्यालायकडून पोहोचवण्याची व्यवस्था केली असल्याचे सांगितले. या वेळी डॉ. एस. एस.मेंगाळ, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर.आर.भोसले, डॉ. एम.व्ही.देशमुख, प्रा.आर.एस.आठवले, प्रा. के.डी.मिटकर, डॉ. खंदारे, प्रा.डोके आदी उपस्थित होते.
शेवटी,इंद्रायणी महाविद्यालयाच्या या उपक्रमाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, विद्यार्थ्यांची तरुणाई केवळ पुस्तकी ज्ञानात नव्हे, तर समाजाच्या प्रत्येक दुःखद प्रसंगात उभी राहू शकते. ‘हाच खरा ‘सेवा परमो धर्मः’ चा संदेश घेऊन विद्यार्थ्यांनी केलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे.






