जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंजवडी परिसरात वृक्षारोपण हेन्केल कंपनीचा उपक्रम
हिंजवडी :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंजवडी येथील हेन्केल कंपनीच्या वतीने परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. कंपनीच्या १५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या निमित्ताने १५० देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन (एचआयए)चे अध्यक्ष शंकर सालकर, एमआयडीसीचे अधिकारी राजेंद्र तोटला, हेन्केलचे व्यवस्थापक डॉ. प्रसाद खंडागळे, निलेश आडकर, उमेश हरकल तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत वृक्षारोपणात उत्साहाने सहभाग नोंदविला.
हेन्केल कंपनी गेल्या सात वर्षांपासून हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन, एमआयडीसी आणि वन विभाग यांच्या सहकार्याने हिंजवडी परिसरातील रस्त्यांच्या कडेला तसेच परिसरातील टेकड्यांवर स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करीत आहे. या कालावधीत एक हजाराहून अधिक वृक्षांचे रोपण करून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे.तसेच एचआयएच्या सहकार्याने वृक्षांचे दीर्घकालीन संवर्धन व देखभाल केली जाते.
यावेळी बोलताना हेन्केलचे व्यवस्थापक डॉ. प्रसाद खंडागळे म्हणाले, “प्रत्येक कर्मचारी वर्षभरात जितका ऑक्सिजन वापरतो, तितकाच ऑक्सिजन निर्माण करण्याची कंपनीची वचनबद्धता आहे. वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे हे पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष शंकर सालकर म्हणाले, “वृक्षारोपणाबरोबरच जमीन पुनर्संचयित करणे, टेकड्या हिरव्यागार करणे, रस्त्यांच्या कडेला अधिक वृक्षांची लागवड करणे आणि दुष्काळाविरोधी पर्यावरणीय प्रतिकारशक्ती निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. अनेक उद्योगसंस्था या दिशेने सकारात्मक पावले उचलत आहेत.”एमआयडीसीचे अधिकारी राजेंद्र तोटला यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, हिंजवडी एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण मिळावे यासाठी एचआयए सातत्याने प्रयत्नशील आहे. वृक्षारोपणासाठी भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.कार्यक्रमाचे नियोजन कीर्तीकुमार काटकर, शिल्पा नयापती, मनाली भोसले, तनु जाधव आणि अरुण पवार यांनी केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला






