वृंदा गुरुकुल फाउंडेशनतर्फे अबॅकस व वैदिक मॅथ्स पुस्तकांचे प्रकाशन आणि विद्यार्थ्यांना वाटप
देहू : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कौशल्य विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या वृंदा गुरुकुल फाउंडेशनच्या वतीने अबॅकस व वैदिक मॅथ्स पुस्तकांचे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना अबॅकस पुस्तके तसेच अबॅकस टूल्सचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य श्री. उद्धव होळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती श्री. सुनील भंडारी (देहूगाव) तसेच युवा उद्योजक व कंटेंट क्रिएटर श्री. अमोल साळुंखे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन तसेच अबॅकस टूल्सचे अनावरण करण्यात आले.
यावेळी संस्थेमार्फत सौ.ज्योती तौर अकॅडमीच्या टीचर तसेच जर्मन भाषा तज्ञ सलोनी रोकडे याही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृंदा गुरुकुल फाउंडेशनचे फाउंडर डायरेक्टर प्रा. रुपेश फोंडे यांनी प्रास्ताविक सादर करत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अत्यल्प शुल्कात किंवा मोफत उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या संस्थेच्या चार शाखांमधून विविध स्किल डेव्हलपमेंट उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत.
संस्थेमार्फत अबॅकस, वैदिक मॅथ्स, फोनिक्स, स्पोकन इंग्लिश, जर्मन भाषा, जपानी भाषा, हस्ताक्षर सुधारणा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, चित्रकला आदी अभ्यासक्रमांसोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मंथन, नवोदय, स्कॉलरशिप, एमटीएस व एनएमएमएस परीक्षांसाठी विशेष कोर्सेसही घेतले जातात. तसेच या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या अभ्यासिकेची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
“जर्मन भाषेच्या मोफत बॅचेसला तसेच अबॅकस, स्पोकन इंग्लिश व ‘समर स्किल कॅम्प 2026’ या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचेही सांगण्यात आले.” अबॅकस व वैदिक मॅथ्समुळे विद्यार्थ्यांची गणितातील गती वाढण्यास मोठी मदत होणार असून भविष्यात या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आजकाल अशा प्रकारच्या कोर्सेससाठी मोठ्या प्रमाणावर फी आकारली जाते. मात्र वृंदा गुरुकुल फाउंडेशनने अत्यल्प दरामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देत समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच त्यांचे स्किल डेव्हलपमेंट व्हावे, विद्यार्थ्यांचे केवळ मार्क्सच नव्हे तर व्यक्तिमत्त्व आणि कौशल्येही विकसित व्हावीत, हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रा. रुपेश फोंडे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्री. उद्धव होळकर यांनी वृंदा गुरुकुल फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. “संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्य विकासाची उत्तम संधी मिळत आहे. अशा संस्था समाजासाठी प्रेरणादायी ठरतात,” असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे श्री. सुनील भंडारी यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात संस्थेच्या शाखा अधिक वाढतील आणि समाजातून संस्थेला अधिक पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
युवा उद्योजक व कंटेंट क्रिएटर श्री. अमोल साळुंखे यांनी वृंदा गुरुकुल फाउंडेशनच्या अभ्यासिका उपक्रमाबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. रुपेश फोंडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






