*विठ्ठल नामाची शाळा भरली*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. शाळेतील बाल वारकरी प्रज्योत गायकवाड,विघ्नेश डाळिंबकर,सप्तश्री उगले, आराध्या फुके या विद्यार्थ्यांनी वारी व वारकरी याचे महत्त्व सांगितले. तसेच सहशिक्षिका प्रतिमा पाठक यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी व देवशयनी एकादशी याचे महत्त्व सांगितले संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे यांनी मनोगतात संतांची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी विष्णूचे अवतार असलेले पांडुरंग व विठ्ठल ही एकाच देवाची रूपे आहेत हे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले.
इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थिनींनी पाऊले चालती पंढरीची वाट हा अभंग सादर केला. यानंतर वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान वारकऱ्यांचा विठु नामाच्या गजरात रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल रुक्माई, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, मुक्ताबाई अशा संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्याचे खास आकर्षण ठरले होते. शाळेच्या मैदानावर पंढरपूरच्या वारी प्रमाणे रिंगण करून मुलांनी हातात भगवे झेंडे व मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखीची मिरवणूक काढण्यात आली.विठू माऊली तू माऊली जगाची अशा अनेक अभंगासोबत रखुमाईच्या भक्तीत बाल वारकरी दंग झाले. जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगाचे गायन करून टाळ व विना यांच्या तालावर ठेका धरत बाल वारकरी फुगडी खेळत विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर करत मुलांनी शिस्तबद्ध वारीचा आनंद घेतला.यावेळी संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे, संचालिका मंगलाताई काकडे,सोनल काकडे,सुप्रिया काकडे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर पर्यवेक्षिका ज्योती सावंत, कीर्ती कुलकर्णी,अश्विनी भट या उपस्थित होते. सूत्रसंचालन माधुरी गवस यांनी करुन आभार मानले.