वैष्णवी हगवणे प्रकरणात माजी मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा अडचणीत – प्रीतम पाटीलसह पाच जणांना अटक, मावळ मधील दोघांचा समावेश
पिंपरी चिंचवड:
वैष्णवी हगवणे संशयित आत्महत्या प्रकरणात नवे वळण आले असून, या प्रकरणात कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील अडचणीत आला आहे. फरार आरोपी राजेंद्र हगवणे याला मदत केल्याच्या आरोपाखाली प्रीतम पाटीलसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
राजेंद्र हगवणे हा वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो काही दिवस फरार झाला होता. दरम्यान, पोलीस तपासात समोर आले की, आरोपी राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला लपवण्यास, राहण्याची व्यवस्था करून देण्यास आणि आर्थिक मदत करण्यास प्रीतम पाटील व इतरांनी भूमिका बजावली. यामध्ये कर्नाटकातील एका हेरिटेज रिसॉर्टमध्ये केलेल्या बुकिंगचाही समावेश आहे, जे प्रीतम पाटील यांच्याच नावावर असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कलम २१२ (फरार आरोपीस आश्रय देणे) आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या कारवाईमुळे दोन्ही राज्यांतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणात कोणालाही अभय न देण्याची भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणात आता संगठित स्वरूपात मदत करणाऱ्या मंडळींचा शोध सुरू असून, आणखी काही मोठी नावे उजेडात येण्याची शक्यता आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे
१) मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय 60, रा. वडगाव मावळ)
२) बंडू लक्ष्मण फाटक (वय 55, रा. लोणावळा)
३) अमोल विजय जाधव (वय 35, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा)
४) राहुल दशरथ जाधव (वय 45, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा)
५) प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक)