उर्सेच्या जुन्या टोलनाक्यावर एसटी बसथांबा करण्याची मागणी.
उर्से :
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से येथील जुन्या टोल नाक्याच्या जागेवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस थांबण्यासाठी अधिकृत थांबा मंजूर करावा, अशी मागणी भूमाता शेतकरी कृती समितीने केली आहे.
कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार, कृष्णाजी कारके, सुनील गुजर, सडवलीचे सरपंच अजय चौधरी, डॉ. नीलेश मुन्हे, संतोष केदारी, गुलाबराव घारे, विलास दळवी, गुलाबराव धामणकर, संदीप आंबेकर आदींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह संबंधित विभागांना याबाबत निवेदन पाठवले आहे. द्रुतगती महामार्गावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरामध्ये तसेच दुसऱ्या राज्यातील बस देखील ये-जा करतात.
ही प्रवासी वाहतूक करत असताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबण्यासाठी महामंडळाचा अधिकृत बस थांबा नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचण व समस्या निर्माण होत असून आर्थिक नुकसान देखील होत आहे. अधिकृत बसथांबा होण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, मावळ तालुका प्रवासी संघ सतत मागणी करत आहे.
मागण्या पुढीलप्रमाणे
1.द्रुतगती महामार्गावरील जुन्या उर्से टोलनाक्यावर ‘अधिकृत बस थांबा’ (एस टी स्टॉप) मंजूर करावा
2.उसें टोलनाक्यावर होणारा अधिकृत बस थांबा महामार्गाच्या मुंबई व पुण्याच्या दिशेला दोन्ही बाजूने व्हावेत
3. वीज, पाणी, शौचालय, सुरक्षा कर्मचारी आदी सुविधा कराव्यात उर्से टोलनाका तसेच उसें खिंड ते वडगाव फाट्यापर्यंत रस्ते विकास
4.महामंडळ व संबंधित विभागाने रस्त्याच्या कडेने प्रवाशांच्या व वाहन चालकाच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रीट लाइटची व्यवस्था करावी.






