तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक : अंतिम मतदार यादी जाहीर; ६४ हजार ६७८ मतदार ठरवणार शहराचे भविष्य
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी जाहीर झाली आहे. एकूण ६४,६७८ मतदार यंदाच्या निवडणुकीत शहराचे भविष्य ठरवणार आहेत. यापैकी ३३,३०१ पुरुष, ३१,३७५ महिला, तर २ इतर मतदार आहेत.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य शासनाच्या आदेशानुसार ही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर आता निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांना वेग आला आहे.
१४ प्रभागांत मतदार नोंद; प्रभाग क्रमांक ९आघाडीवर, १४त सर्वात कमी मतदार
तळेगाव नगरपरिषदेच्या १४ प्रभागांतील मतदारसंख्या निश्चित झाली आहे.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वाधिक ५,८९० मतदार असून, प्रभाग क्रमांक ५मध्ये सर्वात कमी ३३९२ मतदार आहेत.
इतर प्रभागांतील मतदारसंख्या ३,३०० ते ५,८९० दरम्यान आहे.
प्रभाग पुरुष महिला इतर एकूण
1 2614 2406 0 5020
2 2893 2425 0 5318
3 2872 2762 1 5635
4 2432 2395 1 4825
5 1684 1709 0 3392
6 2329 2159 0 4488
7 2181 2150 0 4331
8 2570 2202 0 4772
9 2975 2915 0 5890
10 1763 1767 0 3530
11 2681 2481 0 5162
12 1864 1890 0 3754
13 2542 2315 0 4857
14 1901 1801 0 3702
एकूण 33,301 31,375 2 64,678
२०१६ मध्ये भाजप सत्तेत; यंदा समीकरणे बदलणार का?
२०१६ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगर परिषदेवर बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती.
मात्र, गेल्या काही वर्षांतील पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता, प्रशासनातील निर्णय या विषयांवरून विरोधकांनी टीका वाढवली आहे. त्यामुळे यंदा मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतो, हे शहराचे राजकीय भविष्य ठरवणारे ठरेल.
तरुण नेतृत्व आणि नव्या चेहऱ्यांची चर्चा
या निवडणुकीत तरुण नेतृत्व आणि नवोदित उमेदवारांना संधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
स्थानिक गट, सामाजिक संघटना आणि प्रभागनिहाय प्रभावी व्यक्तींनी जनसंपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत.
शहरातील राजकीय हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे.
पक्षांतर्गत हालचालींना ऊत
मतदारयादी जाहीर होताच, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष गटांमध्ये तिकीट वाटपाच्या हालचालींना वेग आला आहे.
काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी व मतभेदही दिसत आहेत. संभाव्य उमेदवार प्रभागनिहाय मतदारसंख्येचा बारकाईने अभ्यास करत आहेत.
आचारसंहितेची प्रतीक्षा
राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रमाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
आचारसंहिता लागू होताच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
दरम्यान, प्रशासनाने मतदार यादीनुसार मतदान केंद्रांची प्राथमिक यादी तयार करण्याचे काम सुरु केले आहे.
नागरिकांच्या मतांचा कल कोणत्या दिशेने?
शहरात निवडणुकीचे तापमान चढू लागले असून, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि विकासकामे या स्थानिक प्रश्नांवरून मतदारांची भूमिका ठरणार आहे.
तळेगावकर कोणत्या दिशेने मतदानाचा कल दाखवतात, हेच आगामी पाच वर्षांसाठी शहराच्या विकासाचे चित्र रेखाटणार आहे.






