तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मोठा बदल; विजयकुमार सरनाईक यांची बदली, गिरीश दापकेकर नवे मुख्याधिकारी
तळेगाव दाभाडे : सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनात मोठे बदल झाले आहेत. विद्यमान मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी गिरीश दापकेकर यांची नवीन मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.
नगरविकास विभागातील उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या स्वाक्षरीचा हा आदेश नुकताच नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमधील विद्यमान सीईओ विजयकुमार सरनाईक यांची पदोन्नती होऊन बदली करण्यात आली असून, त्यांना नागपूर विभागीय आयुक्तालयात उपायुक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या मुख्याधिकाऱ्याच्या पदावर पुणे महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार दापकेकर यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विजयकुमार सरनाईक यांची बदली ही नियमित पदोन्नती प्रक्रियेचा भाग असल्याचे शासनस्तरावर स्पष्ट करण्यात आले आहे.
सरनाईक यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्य करताना विविध विकासकामे गतीने राबविली. त्यांच्या कार्यकाळात नगरपरिषद प्रशासनाचे कामकाज पारदर्शकतेकडे वाटचाल करत गेले. विशेष म्हणजे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वास नेऊन तिचे लोकार्पण त्यांच्या कार्यकाळात करण्यात आले. नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांनी अनेक नागरी उपक्रम राबविले. या कामामुळे तळेगावकरांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले होते.
नवीन मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणारे गिरीश दापकेकर हे अनुभवी प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्य केले असून, पुणे महानगरपालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी करसंकलन, नागरी नियोजन आणि महसूल व्यवस्थापन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
तसेच, गिरीश दापकेकर हे राज्यस्तरीय करसल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासन अधिक कार्यक्षमतेने चालेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलामुळे स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन मुख्याधिकारी म्हणून दापकेकर कोणत्या प्राधान्याने काम सुरू करतात, कोणते उपक्रम हाती घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विकासकामांना गती देत नागरिकांसाठी सुविधा वाढविणे हे दोन्ही अधिकाऱ्यांचे समान ध्येय असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.






