टाकवे येथे होणार आंद्रा धरणग्रस्त शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक .दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर न्यायासाठी नवा लढा

SHARE NOW

टाकवे : आंद्रा धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आंद्रा धरणग्रस्त संघटना, मावळ तालुका यांच्या वतीने सोमवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता टाकवे येथील श्री दत्त मंदिरात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. दोन दशकांपूर्वी जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याला नवसंजीवनी मिळावी, या हेतूने ही बैठक होत आहे.

 

आंद्रा धरण प्रकल्पासाठी मावळ तालुक्यातील १३ गावांतील सुमारे ४१२ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या संपादनाला आज वीस वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी अद्याप योग्य भरपाई आणि पुनर्वसन मिळालेले नाही. परिणामी हे शेतकरी भूमिहीन बनले असून अनेक जण आजही उपजीविकेसाठी संघर्ष करत आहेत.

 

या पार्श्वभूमीवर धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या आणि पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार आहे.

बैठकीत प्रमुख चर्चेचे मुद्दे पुढीलप्रमाणे असतील :

 

1. बुडीत क्षेत्राबाहेरील जमिनींचे पुनर्नामांकन :

धरणामुळे ज्या जमिनी प्रत्यक्ष पाण्याखाली जात नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या नावे कायमस्वरूपी करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येणार आहे. सध्या शासनाने या जमिनीही संपादित केल्या असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला आहे.

 

 

2. भामा आसखेड धरणाच्या धर्तीवर भरपाई :

भामा आसखेड धरणग्रस्तांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६५ टक्के रक्कम भरून जमिनी वाटप करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, तोच कायदा आंद्रा धरण प्रकल्पग्रस्तांना लागू करून ६५ टक्के रक्कम भरून जमीन वाटप करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनेतर्फे केली जाणार आहे.

Advertisement

 

 

3. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पाणीपुरवठा विरोध :

आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच तळेगाव MIDC साठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, यामुळे मावळ व इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीटंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की, मावळातील पाण्यावरील स्थानिकांचा हक्क अबाधित ठेवला जावा, तसेच जर पाणी नगरपालिकेला देण्यात आले, तर धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या, व्यापारी भूखंड व गाळे देण्यात यावेत.

 

 

4. धरणग्रस्त दाखले आणि पुनर्वसनाची मागणी :

धरणग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक दाखले मिळविण्यासाठी शासकीय कॅम्पचे आयोजन करण्यात यावे, तसेच हे दाखले विना स्टँप शुल्क देण्यात यावेत, अशी मागणी बैठकीत केली जाणार आहे.

 

 

5. शिरे शेटेवाडी गावाचे पुनर्वसन :

धरणाच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या शिरे शेटेवाडी गावाचे पुनर्वसन तत्काळ करण्यात यावे, अशी महत्त्वाची मागणीही बैठकीत मांडण्यात येणार आहे.

 

 

 

या बैठकीला मावळ तालुक्यातील सर्व आंद्रा धरणग्रस्त शेतकरी, स्थानिक नेते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी न्यायाची याचना करून थकलेल्या या शेतकऱ्यांना आता या बैठकीतून नवा मार्ग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

धरण प्रकल्पामुळे दोन दशकांपासून आपले जीवन उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या या लढ्याची ही बैठक पुनर्वसन, भरपाई आणि पाण्यावरील हक्काच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page