मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) इच्छुकांचे मागितले उमेदवारी अर्ज
मावळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजताच मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) तर्फे उमेदवारी अर्ज मागविण्यात आल्यानंतर पक्षातील इच्छुकांच्या गर्दीने कार्यालयात चांगलीच लगबग निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत स्पर्धा चुरशीची बनली असून अनेक नव्या चेहऱ्यांचे आगमन या निवडणुकीला वेगळा रंग देत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उत्साह
मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, “संबंधित निवडणुकांसाठी आरक्षण निश्चित झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज स्थानिक अध्यक्षांकडे सादर करावेत.
लोणावळा नगरपरिषदेसाठी अर्ज रवि दत्तात्रय पोटफोडे, अध्यक्ष — लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष — यांच्याकडे स्वीकारले जाणार आहेत. तर वडगाव नगरपंचायतीसाठी अर्ज प्रविण ढोरे, अध्यक्ष — वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडे जमा करावेत, असे पत्रकात नमूद आहे.
विभागनिहाय प्रक्रिया निश्चित
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी विभागनिहाय अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे.
आंदर मावळसाठी रूपेश घोजगे, पवन मावळ (पूर्व) साठी भरत भोते, पवन मावळ (पश्चिम) साठी लाला गोणते, नाणे मावळसाठी साईनाथ गायकवाड, कामशेत शहरासाठी निलेश दाभाडे, तर इंदोरी शहरासाठी दिनेश चव्हाण यांच्या कडे अर्ज सादर करता येतील.
सर्व अर्ज पूर्ण तपशीलांसह व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शिस्तबद्ध व पारदर्शक प्रक्रिया
आमदार शेळके व तालुका अध्यक्ष खांडगे यांनी स्पष्ट केले की, “पक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्णतः शिस्तबद्ध, पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने पार पाडली जाणार आहे. गैरसमजांना वाव न देता सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्या हितासाठी एकदिलाने काम करावे.
दरम्यान, तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच अर्ज मागविले असून, शहर कार्ड कमिटीने तब्बल ८३ इच्छुकांची मुलाखत पूर्ण केली आहे. या मुलाखतींचा अहवाल आमदार शेळके व तालुका अध्यक्ष खांडगे यांच्या स्वाधीन देण्यात आला आहे.
उमेदवारीसाठी नवा उत्साह, नवे चेहरे
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड उत्साह असून, अनेक तरुण नवे चेहरे देखील पुढे येत आहेत.
मागील निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनुभवी पदाधिकाऱ्यांसह नव्या पिढीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक रणधुमाळीला सुरुवात
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन भक्कम असल्याने निवडणूक तयारीस वेग आला आहे. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत मजबूत उपस्थिती राखणाऱ्या मावळ मतदारसंघात स्थानिक निवडणुका हा पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरणार आहे.
आगामी आठवड्यांत उमेदवारी अर्जांची तपासणी, अंतर्गत चर्चासत्रे आणि अधिकृत उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदा या तिन्ही स्तरांवर संघटनात्मक बळावर विजय मिळविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.
एकदिलाने निवडणुकीत झेप घेणार राष्ट्रवादी
पक्षांतर्गत स्पर्धा असली तरी अखेर सर्व कार्यकर्ते एकदिलाने निवडणुकीच्या रणांगणात उतरतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
मावळच्या राजकीय रंगभूमीवर आता निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश, आत्मविश्वास आणि संघटनेबद्दलची नवी ऊर्जा ओसंडून वाहताना दिसत आहे.






