*वडगावचा सोन्याचा क्षण! गरीब कुटुंबाच्या हाती ‘लाखाचा’ स्कूटीचा बक्षीस* कपड्यांच्या खरेदीसोबत मिळालं ‘दिवाळीचं गोड सरप्राईज’
देहूगाव :
नशीबाचं चक्र कधी, कुठे, आणि कसं फिरतं हे कोणालाच सांगता येत नाही… पण कधी कधी एखादा साधा दिवसही सोन्याचा ठरतो! वडगाव (मावळ) येथील मुकेश राजपूत या मेहनती शेतकऱ्याच्या गरीब कुटुंबावर आज असा सोन्याचा क्षण उजाडला — कारण कपडे खरेदी केल्यानंतर मिळालेल्या एका साध्या कुपनने त्यांना तब्बल एक लाख रुपये किंमतीची स्कूटी जिंकून दिली!
देहू आळंदी रोडलगत, जैन मंदिराशेजारील ‘श्रीराम फॅशन हब’ या नामांकित कपड्यांच्या दुकानात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बंपर बक्षीस योजना ठेवण्यात आली होती. पाच हजार रुपयांहून अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी स्कूटी, ३२ इंची एलईडी टीव्ही, सोन्याची नथ अशी तब्बल १ लाख २० हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत मुकेश राजपूत यांनी पाच हजार रुपयांची खरेदी करून कुपन घेतलं होतं. आणि नशिबाने त्यांच्यावर अशी कृपा केली की, शुक्रवार (ता. २४ ) रोजी झालेल्या सोडतीत टनवल कंपनीची एक लाख रुपये किमतीची स्कूटी त्यांच्या नावावर लागली!
दुकानाचे चालक गणेश पुजारी व सोहन परदेशी यांनी राजपूत दांपत्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करत स्कूटीची चावी सुपूर्द केली. त्यावेळी राजपूत कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थितांनाही समाधान लाभले.
मुकेश राजपूत हे मूळचे गुजरातचे असले तरी गेली चार पिढ्या त्यांचं वंशपरंपरागत वास्तव्य वडगाव (मावळ) येथेच आहे. आजही ते शेती करून उदरनिर्वाह करतात. आपल्या मेहनती हातांनी जगणाऱ्या या कुटुंबाच्या आयुष्यात आलेली ही ‘लाखाची स्कूटी’ म्हणजे अक्षरशः दिवाळीचा बोनसच!
“आमच्यासाठी ही मोठी भेट आहे. असा आनंद कधी वाटला नव्हता. आमचं नशीब उजडलं,” असे भावूक शब्द राजपूत यांनी सांगितले.
खरंच, कुणाचं नशीब कधी, कुठे खुलतं — हे सांगणं कठीणच!






