असं काही करा ज्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं घडेल…. तृप्ती शामराव निंबळे

पिंपरी चिंचवड :

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित… क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचवड येथे  दिनांक ३ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी *स्त्री शिक्षण प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त* बालिका दिन, महिला मुक्ती दिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तृप्ती शामराव निंबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की आता तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात आईवडिलांना माहित न होता काही गोष्टी चोरून कराव्या वाटत असेल परंतु चोरून करायचेच असेल तर असे काही करा की त्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं घडेल. आयुष्य बरबाद होईल अशा कोणत्याही गोष्टीला बळी जाऊ. खूप शिका आणि नाव कमवा. आपण स्त्रीयाही पुरुषांप्रमाणे कणखर आहोत.

मावळची सुवर्ण कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या तृप्ती निंबळे यांचे आजचे वय फक्त २६ वर्ष असले तरी कार्य, कर्तव्य आणि किर्ती मात्र खूप व्यापक, महान आहे. देश आणि परदेशात तायकांदो कराटे स्पर्धेत अनेक सुवर्ण पदक कमावणारी ही धाडसी सुवर्ण कन्या इंग्रजी शाळेत भक्कम पगारावर शारीरिक शिक्षिका म्हणून कार्यरत असुनही स्वतः ट्रॅक्टर चालवून नांगरणी, वखरणी करते. भात लावणी, मळणी करत शेती करते. त्यां म्हणतात कष्ट केले तर चांगले फळ मिळतेच. सावित्रीबाई फुले यानी कष्ट केले म्हणून आज आपण शिकत आहोत. आजच्या तरुण स्त्री पिढीला आदर्श असलेल्या तृप्ती निंबळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मोलाचा सल्ला दिला.

Advertisement

तृप्ती निंबळे यांनी स्वतः होऊन पुढील शैक्षणिक वर्षात गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच उन्हाळी सुट्टीत विद्यार्थीनींना स्वसंरक्षणासाठी कराटे, लाठीकाठी आणि कुस्तीचे मोफत प्रशिक्षण देण्याचेही निश्चित आश्वासन दिले.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि प्रतिमापुजाने सरस्वती वंदना घेऊन करण्यात आली. शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. इयत्ता ९ वी च्या अक्षरा चव्हाण, स्वेता खेंगरे, पौर्णिमा सकट या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलें यांना अभिवादनपर गीत सादर केले. इयत्ता ११ वी ची ऋतुजा वाघमारे या विद्यार्थिनीने ‘मी सावित्री बोलते’ हा प्रयोग सादर केला तर सौ. दिपाली शिंदे यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्रशालेच्या मुख्या. सौ. वर्षा जाधव यांनी विद्यार्थ्यांना आज संध्याकाळी ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या नावे अंगणात, दारात एक पणती लावण्याचा उपक्रम करायला सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैशाली कयापाक यांनी केले . प्रास्ताविक सौ. शुभांगी बडवे यांनी मांडले. अतिथी परिचय सौ. राजश्री पाटील यांनी करून दिला तर सौ. सुलभा झेंडे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, वैशाली कयापाक, सौ. शुभांगी बडवे, सौ. सुलभा झेंडे, सौ. राजश्री पाटील, सौ. दिपाली शिंदे, सौ. सुलभा लोंढे या सर्व शिक्षिका तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

समिती सदस्य मा. आसाराम कसबे यांच्या गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page