सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ अंतर्गत मावळ तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न
वडगाव मावळ:
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि पाणी फाउंडेशन फार्मर कप यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ अंतर्गत मावळ तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पंचायत समिती, मावळ (जि. पुणे) येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. कुलदीप प्रधान (गट विकास अधिकारी, पं.स. मावळ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी मा. श्री. मारुती साळे, उपविभागीय कृषी अधिकारी, पुणे कार्यालयातील तंत्र अधिकारी मा. श्री. रोहित क्षिरसागर, तसेच मा. श्री. संताजी जाधव (कृषी अधिकारी, पंचायत समिती, मावळ) उपस्थित होते.
तसेच पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक मा. श्री. सुखदेव भोसले, मा. श्री. ननावरे (माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी), तसेच प्रशिक्षणासाठी श्री. प्रतीक गुरव, श्रीमती मानसी बर्गे आणि श्रीमती अपूर्वा भारमल (प्रशिक्षक, पाणी फाउंडेशन) यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ या उपक्रमाच्या उद्दिष्टांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मृदा व जलसंवर्धन, शाश्वत शेती पद्धती, शेतकऱ्यांच्या संघटित सहभागाचे महत्त्व, तसेच ‘वॉटर कप’ च्या माध्यमातून गाव पातळीवरील जलसंधारण कार्य कसे अधिक प्रभावी करता येईल, यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणास मावळ तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व कृषी विभागातील विविध कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या विकासासाठी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती मावळ यांच्या वतीने करण्यात आले. ही माहिती कृषी अधिकारी मावळ तालुका सुनील वामन गायकवाड यांच्याकडून मिळाली.






