*देहूगावात वाहतूक विभागाची अन्यायकारक कारवाई; वाहनधारक त्रस्त*
देहूगाव :

पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगावात वाहतूक विभागाकडून दुचाकी वाहनधारकांवर अन्यायकारक कारवाई सुरू असल्याची नागरिकांतून तिव्र भावना व्यक्त होत आहे. वाहन पार्किंगविषयी योग्य माहिती न दिल्याने आणि स्पष्ट व्यवस्था नसल्याने भाविक व नागरिक हैराण झाले आहेत.
देहूगावातील मुख्य कमान ते चौदा टाळकरी कमानदरम्यान रस्त्यालगत सम-विषम तारखेनुसार वाहन लावण्याचे फलक लावले असले तरी ते स्पष्टपणे दिसत नाहीत. देहू बाजार पेठेत आठवड्यातून दोन वेळा बाजार भरतो. अनेक महिला भाजीपाला खरेदीसाठी दुचाकीवर येतात आणि वाहने रस्त्याच्या कडेला लावतात.भाजीपाला खरेदीसाठी बाजारात जातात. त्याच वेळी, तळवड्याहून येणारे टोईंग वाहन दवंडी न देता दुचाकी वाहने उचलून नेते आणि थेट तळवडे पोलिस ठाण्यात ठेवते.
भाविक दर्शनासाठी गेलेले असो वा बाजारासाठी आलेले नागरिक — तळवडे पोलिस ठाणे कुठे आहे हेही अनेकांना माहिती नसते. वाहन मिळवण्यासाठी त्यांना ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो. बरेच वाहनधारक गरीब व मध्यमवर्गीय असल्याने त्यांच्यासाठी हा दंड आर्थिक डोकेदुखी ठरतो आहे.
*चारचाकींवर दुर्लक्ष का?*
स्थानिकांच्या मते, याच मार्गावर दोन्ही बाजूंनी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात पार्क केली जातात, तीही बेसावधपणे, त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. दुचाकींवर कारवाई होत असताना चारचाकींवर मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
*वाहतूक नियंत्रणासाठी पट्टे आवश्यक*
नागरिकांनी अशी मागणी केली आहे की, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिवळे अथवा पांढरे पट्टे मारावेत, ज्याच्या आत वाहने लावण्याची परवानगी असेल. त्या सीमारेषेबाहेर वाहने उभी केली गेल्यास, ती चारचाकी असो की दुचाकी, दंडात्मक कारवाई व्हावी.
*तरुणांवर आर्थिक भार; उदरनिर्वाह कठीण*
युवक वर्गात यासंदर्भात प्रचंड असंतोष आहे. अनेक तरुण ठेकेदारी पद्धतीत १०-१५ हजार रुपयांवर काम करत आहेत. त्यांच्यावर हजारोंच्या दंडाची कारवाई होत असल्याने त्यांचा उदरनिर्वाह संकटात आला आहे. काही जण बँकेचे कर्ज काढून व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर १५ हजार रुपये दंड आणि वाहन जप्तीची कारवाई होणे हे अन्यायकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“दोन वेळचे जेवण कसे मिळवायचे, हप्ते कसे भरायचे, घर चालवायचं कसं?” असा सवाल करत त्यांनी वाहतूक विभागाने नागरिकांची अडचण समजून घ्यावी, अशी मागणी केली आहे.
स्थानिक प्रशासनाने या तक्रारींचे गांभीर्याने घेतले पाहिजे आणि वाहतूक नियंत्रणाबाबत स्पष्ट व सुसंगत व्यवस्था लवकरात लवकर लागू केली पाहिजे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.






