संगीताच्या सप्तस्वरांनी गाजली तळेगावकरांची ‘दीपसंध्या’ माजी नगरसेवक निखिल भगत यांच्यातर्फे आयाेजन रसिकांचा दीपसंध्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव दाभाडे ः

प्रकाशाचे पर्व घेऊन आलेल्या दिवाळी सणाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निखिल उल्हास भगत यांच्या वतीने आयाेजित करण्यात आलेल्या “दीपसंध्या” कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या जादुई स्वरांनी तळेगावकर रसिक तृप्त झाले. संगीताच्या सप्तस्वरांनी रसिकांना अनुभूतीचे कोंदण प्राप्त करून दिले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तळेगाव दाभाडे येथील गाेळवलकर गुरूजी क्रीडांगणावर शुक्रवारी (दि.24) सायंकाळी साडेसहा वाजता “दीपसंध्या” कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या मनमोहक गायनाने रसिक सुरांच्या सागरात बुडून गेले. त्यांच्या सुमधुर आवाजाने शुक्रवारची सायंकाळ तळेगावकरांची अधिकच मंगलमय आणि अविस्मरणीय अशी झाली.
गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी ‘प्रभो विघ्नहर्ता‘, ‘गणनायक‘, ‘खेळ मांडियेला‘, ‘इंद्रायणी काठी‘, ‘बोलावा विठ्ठला‘, ‘माझे माहेर पंढरी‘, ‘हाय गुलाबी हवा‘, ‘मन उधाण वा-याचे‘, ‘सेतू बांधा रे सागरी‘, ‘तुच सुखकर्ता तुच दुःखहर्ता‘, ‘एकविरा आई तू डोंगरावरी‘, ‘मी आहे कोळी‘, ‘उगवली शुक्राची चांदणी‘, ‘आई भवानी‘, ‘लल्लाटी भांडार‘, ‘माऊली माऊली‘… अशी गीते गायन करून रसिकांची मनं जिंकली. प्रत्येक गाण्यानंतर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
माजी नगरसेवक निखिल भगत यांनी उपस्थित सर्व रसिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भगत म्हणाले, तळेगाव दाभाडे शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक असा माेठा वारसा लाभला आहे. त्यामुळेच ‘दीपसंध्या’ कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘दीपसंध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम स्नेह, कला आणि उत्साहाचा सुंदर मिलाप ठरला आहे. भविष्यातही अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयाेजन केले जाईल.
—————————-






