राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने पत्रकार दिन साजरा!
तळेगाव दाभाडे (ता.१२) दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता, लेखन, भाषा प्रभुत्व, सामाजिक विचार आणि आजची मराठी पत्रकारिता या विषयांवर बुधवारी (ता.१०) संवाद-चर्चा करत तळेगाव दाभाडे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला. यामध्ये महिला पत्रकार रेश्मा फडतरे आणि रेखा भेगडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार तथा एमपीसी न्यूज चे संपादक विवेक इनामदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तळेगाव दाभाडेच्या शहराध्यक्षा शैलजा काळोखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भागीवंत होते.
पत्रकार हे कार्यकर्त्यांना दिशा देणारे असून चुकीच्या बाबींवर टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार असून तो समाजव्यवस्थेस संतुलित करत असल्याने गरजेचा आहे. चांगल्या बातम्या छापून आल्यावर खुशी होते, मात्र चुकीच्या गोष्टींवर पत्रकारांनी लिहिले तर त्यावर रागातून व्यक्त होणे चुकीचे असल्याचे यावेळी शैलजा काळोखे म्हणाल्या.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ संचालित पिंपरी चिंचवड येथील पत्रकार संघांनी विवेक इनामदार यांना उत्कृष्ठ पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल इनामदार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी प्रेस फाउंडेशनचे विलास भेगडे, माजी अध्यक्ष अमीन खान, रमेश जाधव गुरुजी, मयुर सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेल मावळ तालुक्याच्या अध्यक्षा शबनम खान, तळेगाव दाभाडे शहर संघटक नीलिमा गुंजाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तळेगाव दाभाडे शहरच्या उपाध्यक्षा संध्या देसाई, विद्या शिळीमकर, अर्चना सोनावणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तळेगाव दाभाडे शहरच्या चिटणीस उषा शिळीमकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कार्याध्यक्षा मनीषा सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्त्या अनिता अतकरे, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे सर्व पत्रकार उपस्थित होते. अमीन खान यांनी प्रास्ताविक केले आणि फाउंडेशनचे सचिव केदार शिरसट यांनी आभार मानले.