रस्ता गेला… पण आशा शिल्लक! राजपुरी–वारंगवाडी ग्रामस्थांची उड्डाणपुलासाठी आर्त मागणी

SHARE NOW

टाकवे बुद्रुक :

राजपुरी आणि वारंगवाडी या दोन गावांना जोडणारा, विद्यार्थी व कामगारांसाठी जीवनवाहिनी ठरलेला नदीपात्रालगतचा कच्चा पर्यायी रस्ता पाटबंधारे विभागाने धडक कारवाई करत हटवल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवला जात असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने हे अतिक्रमण काढले असले, तरी या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.

 

राजपुरी गावातील शाळकरी मुले तसेच वारंगवाडी येथील शेतकरी कामगार व रोजंदारीवर काम करणारे मजूर यांच्यासाठी हा रस्ता अत्यंत सोयीचा आणि जवळचा मार्ग होता. गावकऱ्यांनी कोणत्याही शासकीय मदतीशिवाय श्रमदानातून आणि लोकसहभागातून नदीपात्राच्या लगत हा कच्चा रस्ता तयार केला होता. पावसाळा वगळता वर्षभर या रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले होते. मात्र, नदीपात्रात असल्याने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण होतो, अशी तांत्रिक बाब समोर ठेवत पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट रस्ता खोदून काढला.

Advertisement

 

या कारवाईनंतर विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी लांबचा आणि धोकादायक फेरा घ्यावा लागत आहे. कामगारांचे वेळापत्रक कोलमडले असून, रोजच्या रोजगारावरही परिणाम होत आहे. “हा रस्ता आमच्यासाठी केवळ मातीचा नव्हता, तर आमच्या जगण्याचा आधार होता,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

केवळ रस्ता तोडून प्रश्न सुटणार नाही, तर शासनाने या ठिकाणी नदीच्या प्रवाहाला बाधा न आणता कायमस्वरूपी उड्डाणपूल किंवा पक्का पूल उभारावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावाच्या विकासासाठी आणि पुढील पिढ्यांच्या सोयीसाठी हा प्रश्न शासन दरबारी लावून धरण्याचा निर्धार आता ग्रामस्थांनी केला असून, ‘रस्ता गेला तरी हक्काची मागणी कायम’ असा ठाम सूर सर्वत्र ऐकू येत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page