*पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा व चिखलमय रस्त्याची डागडुजीकरण करा .. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सरकारकडे मागणी*
मावळ :
मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमूग, बाजरी आणि बागायती भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता- तोंडाशी बाजरीचे पीक आले असताना देखील काढता येत नाही, त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्याला सोसावे लागत आहे. तसेच भुईमूग पीकाला पावसामुळे शेतात वापसा नसल्यामुळे काढता येत नाही. काही ठिकाणी शेंगांना मोड येऊ लागले आहेत.
खरीप भात पिकाच्या तयारीच्या कामाला खीळ बसली असून शेतकऱ्यांसमोर भात रोपे कशी तयार करायची याबाबत चिंता लागून राहिली आहे. पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे, तरी त्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
तसेच खरीप पेरणीसाठी बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, बोगस बियाणांची विक्री होऊ नये यासाठी ताबडतोब उपाययोजना करावी.
त्याचप्रमाणे वडेश्वर ते शिंदे घाटेवाडी पर्यंत रस्ता हा संपूर्ण चिखलमय झाला आहे व तालुक्यातील ग्रामीण भागातील इतर रस्ते देखील खराब झाले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना देखील मोठी कसरत करावी लागते यासंबधी संबंधितांना डागडुजीकरण करण्यास ताबडतोब आदेश द्यावेत.
अशा आशयाचे निवेदन मावळचे तहसीलदार मा. विक्रम देशमुख साहेब यांना देण्यात आले.
याप्रसंगी मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ प्रभारी तथा पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, महिला तालुकाध्यक्ष जयश्रीताई पवार, मा.सरपंच कैलास खांडभोर, मा.ग्रा. पं. सदस्य सोमनाथ धोंगडे, ज्येष्ठ नेते बारकूभाऊ ढोरे, दत्तात्रय आंद्रे, सुरज पुरी, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.