ज्ञानसाधनेचा संदेश अन् नासा गर्लचा गौरव; पु. वा. परांजपे विद्यामंदिरात प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे :
पु. वा. परांजपे विद्यामंदिर येथे मंगळवार, दि. १६ जून २०२६ रोजी सद्गुरू श्री. वामनराव पै निर्मित जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र, तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने विश्वप्रार्थना, राष्ट्रगीत व ज्ञानसाधनेचे महत्त्व या विषयांवरील प्रात्यक्षिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जीवन विद्या मिशन तळेगाव शाखेचे अध्यक्ष श्री. समीर देशमुख, सचिव श्री. शरद बोरगे, मावळ सत्यचे वार्ताहर श्री. रामदास वाडेकर, सतर्क महाराष्ट्रच्या संपादिका रेखाताई भेगडे, मुख्याध्यापक श्री. काकासाहेब भोरे, पर्यवेक्षिका सौ. सुमन जाधव व शिक्षक प्रतिनिधी सौ. आशा आवटे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.
यावेळी जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्राचे अध्यक्ष श्री. समीर देशमुख, सचिव श्री. शरद बोरगे, मावळ सत्यचे संपादक श्री. रामदास वाडेकर तसेच सतर्क महाराष्ट्रच्या संपादिका रेखाताई भेगडे यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचे शाब्दिक स्वागत करण्यात आले.
जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्राचे सचिव श्री. शरद बोरगे यांनी विश्वप्रार्थना, राष्ट्रगीत गायन आणि ज्ञानसाधनेचे महत्त्व याविषयी विद्यार्थी व शिक्षकांना अतिशय प्रभावी आणि ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. भोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांनी दिलेल्या प्रेरणादायी विचारांचा जीवनात उपयोग करून आनंदी व यशस्वी जीवन जगण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली विद्यालयात इयत्ता आठवीत नव्याने प्रवेश घेतलेली ‘नासा गर्ल’ कु. रुद्रा गणेश राजगुरे. जि.प. इस्रो-नासा निवड प्रक्रियेत सहभागी होत अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी., ऑर्लॅंडो व केनेडी स्पेस सेंटरला भेट देऊन ATS प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या कु. रुद्राचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुवर्णा काळडोके यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ. सुमन जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






