ज्योती राजीवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बांधवांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी
तळेगाव दाभाडे : बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन मात्र सदैव आॅन ड्युटी असलेल्या पोलिसांना व सैन्य दलातील जवानांना रक्षाबंधना सह इतर सण साजरे करता येत नाही.शनिवार दि ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्यासह इतर अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. यावेळी पोलीस बांधवांनी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळीस तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाज रक्षणाची भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या परिवाराला वेळ देणे शक्य होत नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेल मावळच्या अध्यक्षा सौ ज्योती भरत राजीवडे (शेळके) यांच्या नेतृत्वाखाली व आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या महिला सदस्यांनी पोलिसांना औक्षण करून राख्या बांधल्या. यावेळी सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी भारावले. तसेच सीआरपीएफ कॅम्प येथील जवानांना देखील राख्या बांधण्यात आल्या. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.





