नाट्य परिषदेच्यावतीने पं. सुरेश साखवळकर आणि डॉ.मीनल कुलकर्णी यांचा रविवारी सत्कार
तळेगाव दाभाडे :
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखा मुंबईच्यावतीने संगीत रंगभूमीवरील जेष्ठ रंगकर्मी पं. सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव, तर नृत्य अभ्यासक डॉ. मीनल कुलकर्णी यांना बालरंगभूमीवरील योगदानासाठी अ. सि. केळुस्कर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा १४ जून रोजी दुपारी चार वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री तसेच नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. त्याबद्दल नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने पं. साखवळकर व डॉ. कुलकर्णी यांचा येत्या रविवारी (दि. १५) तळेगाव दाभाडे येथे सत्कार करण्यात येणार आहे.
हा सत्कार समारंभ तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या रिक्रिएशन हॉलमध्ये येत्या १५ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. हा सत्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनील शेळके असणार आहेत. तसेच अ.भा. मराठी नाट्यपरिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नरेश गडेकर, सहकार्यवाह सुनील ढगे, कार्यकारी सदस्य विजयकुमार साळुंके उपस्थित राहणार आहेत.
सत्कार समारंभानंतर बालगंधर्व रसिक संगीत मंडळ पुणे यांचा नाट्य सुमनांजली हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, सचिव संजय वाडेकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.