ऐतिहासिक धम्मभूमी वर्धापन दिनानिमित्त ‘मुस्लिम विकास विचार मंच’चा स्तुत्य उपक्रम.
देहूरोड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतील समता, बंधुभाव आणि एकता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने, ऐतिहासिक धम्मभूमी वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘मुस्लिम विकास विचार मंच’ च्या वतीने एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी, २४ डिसेंबर रोजी धम्मभूमीवर येणाऱ्या सर्व अनुयायांसाठी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मोफत चहा वाटप करण्यात आले.
ऐतिहासिक धम्मभूमी ही क्रांतीची आणि ऊर्जेची भूमी आहे. या पवित्र ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांचे स्वागत करण्यासाठी आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी मुस्लिम विकास विचार मंच नेहमीच सक्रिय असतो.
अध्यक्ष रज्जाक साहेबलाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून बंधुभावाची शिकवण दिली आहे. तोच वारसा पुढे नेत, मुस्लिम समाजाच्या वतीने भीम बांधवांचे प्रेमाने स्वागत करून समाजात सलोखा जपण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.”
या स्तुत्य उपक्रमावेळी मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख, रफिक शेख, ‘बहुजन संघटक’ चॅनलचे संपादक राहुल खांडेकर, गफूर शेख, अरुण जगताप, बापूसाहेब गायकवाड, संकेत जगताप, गौस सुनार, अन्वरअली शेख, शफी सय्यद, जाहिद शिकीलकर, जाकिर सय्यद, सचिन जोगदंड आणि शाहिद शेख यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धम्मभूमीवर येणाऱ्या शेकडो अनुयायांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष भीमपुत्र टेक्सास गायकवाड आणि श्रीमती नारायण देवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांनी चहा वाटप केंद्राला भेट देऊन या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. मुस्लिम बांधवांनी दाखवलेल्या या प्रेम आणि आपुलकीबद्दल सर्व स्तरातून आभार व्यक्त केले जात आहेत.






