“मावळमध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश – आरोपी अटकेत, शस्त्रास्त्रे व मांस जप्त – वनविभागाची तत्पर कारवाई

SHARE NOW

मावळ :

मंगळवार दिनांक १३ मे २०२५ रोजी सकाळी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टिकोनागाव येथे “सिंग बंगल्यावर” वनविभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईत सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय २६, रा. टिकोनागाव) या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे ५२ किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेले काडतुसे आणि शिकारी व सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ९ व ५१ अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई श्री तुषार चव्हाण (उपवनसंरक्षक, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री मंगेश टाटे (सहायक वनसंरक्षक) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात श्री प्रकाश शिंदे (वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव), सौ. सीमा पलोडकर (वनपाल, देवळे), श्री गणेश मेहत्रे (वनपाल, खंडाळा), श्री संदीप अरुण (वनरक्षक, चवसर) आणि सौ. शेलके (वनरक्षक, देवळे) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement

संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने व अचूकतेने पार पडली. जप्त करण्यात आलेल्या मांसाचा नमुना वन्यजीव संशोधन केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी व प्राण्याच्या प्रजातीच्या ओळखीकरिता पाठविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबाबत मालकी व परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

वनविभागाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी. वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page